फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना कंपनीकडून धनादेश अदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:29 PM2021-06-20T16:29:25+5:302021-06-20T16:34:09+5:30
विंचूर : येथील शिवसाई एक्स्पोर्ट फर्म कंपनीच्या कंत्राटदाराने चार महिन्यांपासून शेतकर्यांचे रखडलेले शेतमालाचे पेमेंट न दिल्याने अखेर कंपनी मालकाने शेतकर्यांना कंपनीत बोलावून धनादेशाद्वारे १३ लाखांचे पेमेंट अदा केले. त्यामुळे शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या संबंधित कंत्राटदारावर कंपनी गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहे.
विंचूर : येथील शिवसाई एक्स्पोर्ट फर्म कंपनीच्या कंत्राटदाराने चार महिन्यांपासून शेतकर्यांचे रखडलेले शेतमालाचे पेमेंट न दिल्याने अखेर कंपनी मालकाने शेतकर्यांना कंपनीत बोलावून धनादेशाद्वारे १३ लाखांचे पेमेंट अदा केले. त्यामुळे शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या संबंधित कंत्राटदारावर कंपनी गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहे.
शिवसाई एक्सपोर्ट कंपनीने शेतकऱ्यांचा मका खरेदी करण्यासाठी नेमलेल्या कंत्राटदाराला वेळेत पेमेंट दिले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याप्रकरणी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रांत अधिकारी व लासलगाव पोलीस ठाणे येथे कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. याबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कंपनीचे मालक, व्यवस्थापक व शेतकऱ्यांना बोलावून बैठक घेत दाखल झालेल्या तक्रारीबाबत आढावा घेतला. यावेळी शिवसाई एक्सपोर्ट कंपनीचे मालक संभा शिवाराव, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश चौधरी, सनदी लेखापाल शिवदास आव्हाड यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
कंत्राटदाराने शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचे पैसे न देता फसवणूक केली आहे. याबाबत कंपनीच्या वतीने कंत्राटदाराविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असून, कंपनी शेतकऱ्यांचे पूर्ण पैसे आठ दिवसांच्या आत देईल, असे कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. तसेच आजवर चार वर्षात कंपनीने २४० कोटी रुपयांचा मोबदला शेतकऱ्यांना दिला असून, कंत्राटदाराने शेतकऱ्यांची १३ लाख रुपयांची फसवणूक केली. यातून कंपनीला नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन कंपनीने नेमलेल्या कंत्राटदाराकडून शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे. त्या कंत्राटदारावर कंपनीकडून कारवाई करण्यात येणार असून, त्याच्याकडून शेतकऱ्यांच्या पैशांची वसुली करण्यात येणार आहे. शिवसाई एक्सपोर्टकडून शेतकऱ्यांचा २० तारखेपर्यंत मोबदला देण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार कंपनी मालक व व्यवस्थापक यांनी शेतकर्यांना दिनांक १९ रोजी कंपनीत बोलावून त्यांच्या शेतमालाचे पैसे धनादेशाद्वारे अदा केले. कंपनीने यापुढे अशी वेळ येणार नसून, शेतकर्यांची कुठलीही फसवणूक होणार नाही तसेच कंत्राटदाराऐवजी कंपनीचे प्रतिनिधी नेमणार असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी निफाड, चांदवड, येवला, कोपरगाव तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.