मनपाची देयके ‘एसएमएस’वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:36 AM2018-08-18T00:36:30+5:302018-08-18T00:36:48+5:30
घरपट्टी आणि पाणीपट्टीची देयके वेळेवर येत नसल्याची तक्रार करून अनेक करदाते वेळेत कर भरत नाही, त्यांची अचडण दूर करण्यासाठी महापालिकेच्या वतीने आता पाणीपट्टी आणि घरपट्टीच्या देयक रकमांची माहिती संबंधित करदात्याला एसएमएसद्वारे कळविली जाणार आहे.
नाशिक : घरपट्टी आणि पाणीपट्टीची देयके वेळेवर येत नसल्याची तक्रार करून अनेक करदाते वेळेत कर भरत नाही, त्यांची अचडण दूर करण्यासाठी महापालिकेच्या वतीने आता पाणीपट्टी आणि घरपट्टीच्या देयक रकमांची माहिती संबंधित करदात्याला एसएमएसद्वारे कळविली जाणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होईल, परंतु त्याबरोबर देयकाची प्रत हाती पडली नव्हती असे म्हणण्यास जागाच राहणार नाही. नाशिक महापालिकेत सध्या करवाढीचा मुद्दा ऐरणीवर आहे. महापालिकेला पुरेसे उत्पन्न नाही आणि दुसरीकडे मात्र कामांची अपेक्षा वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर कर चुकवेगिरीला माहिती मिळू नये यासाठी आता नवीन यंत्रणा उभारण्यात येणार आहेत. सध्या महापालिकेचे पाणीपट्टीचे उद्दिष्ट ६० कोटी असून, घरपट्टीचे उद्दिष्ट २६० कोटी रुपये इतके आहेत. त्यातही दोन्ही कामांसाठी १२० कर्मचारी सामाईक असून, त्यांच्यावर ताण पडत असतो. एकदा पाणीपट्टीसाठी रिडिंग घेतल्यानंतर पुन्हा त्याची देयके देण्यास बऱ्याचदा विलंब होतो. पाणीपट्टीची देयके त्रैमासिक, तर घरपट्टीची अर्धवार्षिक असतात. परंतु देयके देण्यास विलंब झाला तर हेच निमित्त ठरते आणि कर थकबाकीदार वाढत जातात. या पार्श्वभूमीवर आता एसएमएसद्वारेच करदात्यांना त्यांच्या देयकाची रक्कम देण्याची तयारी सुरू केली आहे. सध्या महापालिकेच्या वतीने कर्मचारी घरोघर जाऊन पाणीपट्टीसाठी मीटर रिडिंग घेत असून, त्याचवेळी ज्यांच्या नावावर मिळकत आहेत, त्यांचे मोबाइल क्रमांक संकलित केले जात आहेत. त्यानंतर त्यावरच आता महावितरण किंवा बीएसएनएलच्या धर्तीवर देयकांची संक्षिप्त माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे संंबंधित करदात्याला माहिती आता एसएमएसद्वारे उपलब्ध करून दिली जाणार आहे.
फुकट्यांना बसणार दणका
महापालिका हद्दीत १ लाख ९३ हजार वीजमीटर असून, त्यातील ७० टक्के मीटर बंद असल्याने त्यांना सरासरी देयके दिली जातात. त्या पार्श्वभूमीवर यंदा महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बंदमीटरच्या सरासरी देयकात वाढ केली असून, त्यामुळे फुकट्यांना दणका बसणार आहे.