निवडणूक जाहीर होऊनही कॉँग्रेस पक्षात शांतताच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 11:59 PM2017-08-27T23:59:00+5:302017-08-28T00:13:12+5:30
शहर कॉँग्रेसच्या निवडणुका म्हटले की सर्वच इच्छुक आपला कस पणाला लावून प्रतिष्ठेचा प्रश्न करतात, परंतु महिनाभरापूर्वी निवडणुका घेण्यासाठी आलेले निरीक्षक पुन्हा परत दौºयावरच न आल्याने सर्वच वातावरण शांत आहे. त्यामुळे इच्छुकांचे ताबूतही थंडावले आहे.
नाशिक : शहर कॉँग्रेसच्या निवडणुका म्हटले की सर्वच इच्छुक आपला कस पणाला लावून प्रतिष्ठेचा प्रश्न करतात, परंतु महिनाभरापूर्वी निवडणुका घेण्यासाठी आलेले निरीक्षक पुन्हा परत दौºयावरच न आल्याने सर्वच वातावरण शांत आहे. त्यामुळे इच्छुकांचे ताबूतही थंडावले आहे. कॉँग्रेस पक्षाची निवडणुका म्हटल्या की, कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण असते. परंतु लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महापालिका निवडणुकीतही पक्ष अत्यंत वाईट पद्धतीने पराभव झाल्यानंतर आता मुळातच कार्यकर्त्यांत उत्साह नाही. तरीही संघटनात्मक निवडणुका म्हटल्या की कार्यकर्त्यांत उत्साह असतो. गेल्या डिसेंबर महिन्यात संघटनात्मक निवडणुकीसाठी प्राथमिक बैठक झाली. त्यानंतर सभासद नोंदणी झाली. त्यापाठोपाठ सुमारे दीड महिन्यापूर्वी रविशंकर झा यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा एक बैठक झाली. त्यात सभासद नोंदणीचा आढावा घेण्यात आला. प्राथमिक सभासद किती, क्रियाशील सभासद किती अशाप्रकारची माहिती घेतल्यानंतर मात्र पक्षाचे निरीक्षक जे गेले ते परत फिरकलेच नाही. संघटनात्मक निवडणुकीच्या अंतर्गत आधी वॉर्ड, ब्लॉक स्तरावरच्या निवडणुका होतात आणि मग शहर जिल्हाध्यक्षांच्या निवडणुका होत असतात, परंतु आतापर्यंत प्राथमिक निवडणुकाही न झाल्याने निवडणुका कधी होणार हा प्रश्न आहे.
गेल्यावेळी शहराध्यक्षपदाची निवडणूक प्रचंड गाजली होती. कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते अॅड. आकाश छाजेड यांच्या नियुक्तीवरून रणकंदन झाल्याने अनेक नाराजांनी त्यांची साथ सोडली, परंतु त्याचबरोबर समांतर कॉँग्रेस सुरू करून त्यांना अडचणीत आणण्याचे काम सुरू होते. अखेरीस कॉँग्रेसमधील नाराजांची दखल घेऊन पक्षाने आकाश छाजेड यांना हटवून शरद अहेर यांना प्रभारी म्हणून नियुक्त केले. त्यानंतर आतापर्यंत त्यांच्या नेतृत्वाखालीच कामकाज सुरू आहे. तथापि, अहेर यांनादेखील पक्षांतर्गत विरोधाला सामारे जावे लागत असून महापालिका निवडणुकीच्या वेळी त्यांच्यावर विरोधकांशी हात मिळवणी करण्याबरोबरच अनेक आरोप करण्यात आले आणि समांतर कॉँग्रेसच्या बैठका घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता निवडणुकीच्या वेळी सर्व वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.
विरोधामुळे टळली बैठक
समांतर कॉँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष हटविण्यासाठी दोन दिवसांपूर्वीच एक बैठक घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु आता संघटनात्मक निवडणूक होणार असल्याने बैठक घेण्याची गरज नसल्याचे सांगून अनेकांनी बैठकीस विरोध केला. त्यामुळे बैठक टळली होती.