मोराच्या वंशाची कुक्कुटपालनाच्या खुराड्यात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 10:32 PM2021-02-18T22:32:17+5:302021-02-19T01:49:25+5:30
नांदगाव : तालुक्यात जंगलात मोराने घातलेली अंडी चोरून कोंबडीच्या खुराड्यात कोंबड्यांकडून ती उबवून घेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे वन्यप्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
नांदगाव : तालुक्यात जंगलात मोराने घातलेली अंडी चोरून कोंबडीच्या खुराड्यात कोंबड्यांकडून ती उबवून घेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे वन्यप्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
थव्यांनी फिरणाऱ्या मोरांचा वंश कुक्कुटपालनकर्त्यांच्या खुराड्यात वाढू लागल्याच्या घटनांनी भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर यापुढे पाळीव प्राणी म्हणून खुराड्यात जन्माला येणार का, असा प्रश्न वन्यजीवप्रेमींना पडला असून, वनविभागाने याप्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
ह्यजंगल में मोर नाचा किसने देखाह्ण असे म्हणण्याऐवजी कोंबडीच्या खुराड्यातला स्वातंत्र्य हिरावलेला उदास मोर बघण्याची वेळ आली आहे. कारण जंगलात मोराने घातलेली अंडी चोरून कोंबडीच्या खुराड्यात कोंबडीकडून ती उबवून घेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तालुक्यात ठिकठिकाणी आढळणाऱ्या मोरांच्या कळपांची संख्या लक्षणीय आहे. शेतकऱ्यांच्या घराजवळ त्यांचे अस्तित्व दिसून येते. त्यांच्यासाठी शेतकरी दाणापाण्याची व्यवस्था करतात. मात्र अलीकडे काही कुक्कुट व्यावसायिकांनी मोराची अंडी पळवून कोंबडीकडून ती उबवून घेतली आणि कोंबड्यांबरोबरच त्यांनाही खुराड्यात डांबले. अशाच एका खुराड्यात एक मोर डावा पाय गंभीर जखमी झाल्याने कोंबडीच्या खुराड्यात आकांत करताना आढळून आला. त्याच्या जोडीचा दुसरा मोर कुत्र्याने फस्त केल्याची माहिती मिळाली. मल्हारवाडी ग्रामपंचायत हद्दीत बेलदारवाडी येथील डोंगर माथ्यावर हा प्रकार घडला.
तालुक्यात शेकडोंच्या संख्येने मोर आहेत. मोरांची अंडी खाणाऱ्यांबरोबर मोरांचे मांस खाणारे यापूर्वी पकडले गेल्याचे सर्वश्रुत आहे. या पार्श्वभूमीवर कोंबडीच्या पंखाखाली मोराचे अंडे उबवून त्याला खुराड्यात बंदिस्त करणारी मानसिकता सरळ करण्याची गरज आहे. वनविभागाने तातडीने याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी प्राणीप्रेमी करत आहेत.
साकोरा येथे वर्षभरापूर्वी अशीच घटना घडली होती. तेथील कुक्कुटपालक कोंबड्यासोबत मोर पाळत होता हे कळाल्यानंतर त्याला भगवान हिरे या शिक्षकाने वन्यजीव संरक्षण कायद्याची माहिती देऊन मोराची सुटका केली होती. बेलदारवाडीच्या डोंगरावर, कोंबडीच्या खुराड्यात जन्माला आलेला मोर केविलवाण्या अवस्थेत चोचवर करून आ.. आ असा आवाज करत आपल्या वेदनांकडे लक्ष वेधून घेत होता. त्याच्या वेदनांकडे पहिल्यांदा दुर्लक्ष करणाऱ्या वनविभागाने अखेर त्याला ताब्यात घेतले.