पीककर्ज हमीसाठी शिखर बॅँक सकारात्मक
By admin | Published: May 21, 2017 12:18 AM2017-05-21T00:18:26+5:302017-05-21T00:18:49+5:30
जिल्हा बॅँक बैठक : हरिश्चंद्र चव्हाणांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या राज्य शिखर बॅँकेकडे १७८ कोटींच्या ठेवी असून, त्यापोटी आगामी खरीप हंगामात ज्यांनी पीककर्ज भरले आहे, अशा शेतकऱ्यांना वाटपासाठी दीडशे कोटींच्या पीककर्जाची हमी घेण्याबाबत सकारात्मक भूमिका राज्य शिखर बॅँकेने घेतल्याची माहिती बॅँकेचे संचालक खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी दिली.
भाजपा आमदार व खासदारांच्या तसेच पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने शनिवारी (दि. २०) नाशिक जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळाची तसेच सहकारमंत्री सुभाष देशमुख व राज्य शिखर बॅँकेचे अध्यक्ष एल.एम. सुखदेवे यांच्या उपस्थितीत सुभाष देशमुख यांच्या सरकारी सुरूची बंगल्यावर सकाळी बैठक झाली. बैठकीस जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्यासह तब्बल ११ संचालक उपस्थित होते. या बैठकीत जिल्हा बॅँकेच्या आर्थिक परिस्थितीबाबत सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आढावा घेतला. त्यात जिल्हा बॅँकेने केलेले कर्जवाटप, त्यापोटीची थकबाकी, टॉप ट्वेन्टी थकबाकीदार यांची माहिती त्यांनी घेतली. बैठकीस जिल्हा बॅँक संचालक माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, गणपतराव पाटील, अॅड. संदीप गुळवे, डॉ. शोभा बच्छाव, धनंजय पवार यांच्यासह ११ संचालक उपस्थित असल्याचे कळते. सहकार मंत्र्यांशी चर्चाजिल्हा बॅँकेच्या १७८ कोटींच्या ठेवी राज्य शिखर बॅँकेकडे आहेत. त्यापोटी शिखर बॅँकेने खरिपात नाशिक जिल्हा बॅँक खरिपासाठी वाटप करणाऱ्या १५७ कोटींच्या पीककर्जाची हमी घ्यावी, अशी सूचना केल्याचे समजते. तूर्तास जिल्हा बॅँकेला सरकारकडून २५ ते ५० कोटींची मदत दिल्यास जिल्हा बॅँकेचे व्यवहार सुरळीत होतील, असे अध्यक्ष, संचालक व खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार सीमा हिरे, आमदार बाळासाहेब सानप यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना सांगितले. मुख्यमंत्र्यांशी अंतिम चर्चा करून राज्य शिखर बॅँकेला पीक कर्जाची थकहमी आणि २५ ते ३० कोटींचे तातडीने अनुदान उपलब्ध करून देण्याबाबत सहकार विभाग व राज्य शिखर बॅँक कार्यवाही करेल, असा निर्णय झाल्याचे समजते.