जमीन मूल्यांकन होत नसल्याने रखडले पीककर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:11 AM2021-06-10T04:11:41+5:302021-06-10T04:11:41+5:30
नाशिक : शेतकऱ्यांना खरिपाच्या कर्जासाठी जमिनीचे मूल्यांकन सादर करणे अपेक्षित आहे. मात्र, त्यासाठी लागणाऱ्या मूल्यांकनाची कामेच बंद असल्याने ...
नाशिक : शेतकऱ्यांना खरिपाच्या कर्जासाठी जमिनीचे मूल्यांकन सादर करणे अपेक्षित आहे. मात्र, त्यासाठी लागणाऱ्या मूल्यांकनाची कामेच बंद असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अद्याप मूल्यांकनाचे कामकाज सुरू झाले नसल्याचे मुद्रांक आणि नोंदणी कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून सांगितले जात असल्याने शेतकऱ्यांना माघारी परतावे लागत आहे.
यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना कर्जवाटपासाठी २,७०० केाटींंचा आराखडा मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानुसार, बँकांकडून कर्ज वितरितदेखील केले जात असून गेल्या काही दिवसांत ४४५ कोटींच्या कर्जाचे वाटप झालेलेदेखील आहेत. मात्र, जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे अद्यापही मूल्यांकन होत नसल्याने त्यांना पीककर्जाचे वाटप होऊ शकलेले नाही. मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू झाली नसल्याने अनेक प्रकरणे प्रलंबित असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ऑनलाइनची प्रक्रियादेखील पूर्ण होत नसल्याने कार्यालयात चकरा माराव्या लागत असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले.
खरिपाच्या पीककर्जसाठी करावी लागणारी सर्व प्रक्रिया पूर्ण करूनही केवळ मूल्यांकन होत नसल्याचे अडचणी वाढल्या असल्याच्या तक्रारी शेतकरीवर्गाकडून केल्या जात आहेत. नोंदणी आणि मूल्यांकन विभागात तूर्तास मूल्यांकनाचे कामकाज बंद ठेवण्यात आले असल्याचे सांगितले जात असल्याने शेतकऱ्यांना मूल्यांकनासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. दुसरीकडे येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून परस्परविराेधी दावे केले जात असल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यापासून शेतकरी मूल्यांकनासाठी मुद्रांक कार्यालयात चकरा मारत असून त्यांना माघारी परतावे लागत आहे.
शेतकऱ्यांना खरीप पीककर्ज घेण्यासाठीची मोठी प्रक्रिया पार करावी लागते. बँकांची एनओसी घेतल्यानंतर तलाठी कार्यालयातून बोजाविरहित सातबारा उतारा घ्यावा लागतो. ही सर्व प्रक्रिया करूनही जमिनीच्या मूल्यांकनासाठी मुद्रांक कार्यालयात गेलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे मूल्यांकन होण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांपुढील अडचणी वाढल्या आहेत. येथील प्रक्रिया सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
--कोट--
मुद्रांक कार्यालयात मूल्यांकनासाठी अर्ज सादर केला असता अजूनही मूल्यांकन प्रक्रिया सुरू झाली नसल्याचे येथील कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे संबंधितांनी अर्जदेखील स्वीकारलेला नाही. ही प्रक्रिया खरोखरीच बंद आहे की, काही तांत्रिक अडचण आली आहे, याची कोणतीही माहिती दिली जात नाही.
- गणेश कडलग, शेतकरी
--कोट--
मागील महिन्यात १२ ते २३ या तारखांदरम्यान कामकाज लॉकडाऊनमुळे बंद करण्यात आले होते. आता कामकाज नियमित सुरू झालेले आहे. मूल्यांकनाची प्रक्रिया रखडलेली नाही.
- कैलास दवंगे, मुद्रांक जिल्हाधिकारी