सटाण्यात शेंगदाणा ऑइल मिलला भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2022 12:46 AM2022-02-17T00:46:46+5:302022-02-17T00:47:09+5:30
सटाणा शहरापासून जवळच असलेल्या कंधाणे फाट्यावरील स्वदेशी शेंगदाणा ऑइल मिलला बुधवाारी (दि.१६) दुपारी अचानक आग लागली. या भीषण आगीत वीस लाख रुपयांचे नुकसान झाले, तर दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, घटनास्थळी सटाणा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पालिकेचे अधिकारी- कर्मचारी आग विझवण्यासाठी प्रयत्नशील होते.
सटाणा : शहरापासून जवळच असलेल्या कंधाणे फाट्यावरील स्वदेशी शेंगदाणा ऑइल मिलला बुधवाारी (दि.१६) दुपारी अचानक आग लागली. या भीषण आगीत वीस लाख रुपयांचे नुकसान झाले, तर दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, घटनास्थळी सटाणा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पालिकेचे अधिकारी- कर्मचारी आग विझवण्यासाठी प्रयत्नशील होते.
शहरापासून अवघ्या काही अंतरावर नाशिक रस्त्यावरील कंधाणे फाट्यावर भांगडिया कुटुंबीयांची स्वदेशी शेंगदाणा ऑइल मिल आहे. या ऑइल मिलमध्ये सकाळी नेहमीप्रमाणे कर्मचारी काम करीत होते. सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास आतील गुदामाच्या ठिकाणी आग लागून धूर येत असल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी तत्काळ मिलच्या बाहेर पळ काढला; परंतु क्षणार्धात वाढलेल्या आगीमुळे दोन कर्मचारी जखमी झाल्याचे समजते. या मिलच्या अंतर्गत भागात मोठ्या प्रमाणात भुईमूग शेंगांचा साठा असून, याच ठिकाणी ही आग लागली. साहजिकच वाळलेल्या शेंगा, टरफले आणि भुईमूगमधील तेल यामुळे आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे साम्राज्य पसरले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी आग विझवण्यासाठी मिलकडे धाव घेतली, मात्र मोठ्या प्रमाणातील धुरामुळे मदतकार्यात अडथळे निर्माण होत होते.
इन्फो
आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
आगीची माहिती मिळताच सटाणा पालिकेचा अग्निशमन बंब तत्काळ घटनास्थळी दाखल झाला. पाठोपाठ पालिकेचे तीन टँकरही घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न करीत होते. दुपारपर्यंत अग्निशमन बंबाने पाच ते सहा फेऱ्यांद्वारे पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मालेगाव महानगरपालिकेचा अग्निशमन बंबही पोहोचला. आग पसरू नये म्हणून गुदामाचा पत्रा बाहेरून कापून जेसीबीच्या साहाय्याने आतील शेंगांचे पोते व टरफले बाहेर काढले.
घटनास्थळी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुभाष अनमूलवार, पालिकेचे मुख्याधिकारी नितीन बागुल, सहायक पोलीस निरीक्षक किरण पाटील, उपनिरीक्षक राहुल गवई आदींसह पालिकेचे आस्थापनाप्रमुख व पोलीस कर्मचारी उपस्थित राहून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना करीत होते.