म्हणायला पादचारी मार्ग; पण गाड्या, दुकानांचे अतिक्रमण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:15 AM2021-07-29T04:15:20+5:302021-07-29T04:15:20+5:30
शहरात दरवर्षी दोनशे ते तीनशे केाटी रुपये महापालिका केवळ रस्त्यांवर खर्च करीत असली तरी फुटपाथ किंवा पादचारी मार्ग नावालाच ...
शहरात दरवर्षी दोनशे ते तीनशे केाटी रुपये महापालिका केवळ रस्त्यांवर खर्च करीत असली तरी फुटपाथ किंवा पादचारी मार्ग नावालाच आहेत. त्यावर बहुतांश मार्गांवर अतिक्रमणे आहेत. अगदी मार्गांवर संपूर्ण अतिक्रमण नसले तरी फेरीवाले उभे असतात. काही वेळा रस्त्याच्या कडेला दुकानांसमोर पादचारी मार्ग असले तर त्यावर ग्राहकांची गर्दी असल्याने पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले आहे. शहरातील जुन्या मार्गांवर हे आढळतेच; परंतु अलीकडे साकारलेला त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ दरम्यानच्या स्मार्ट राेडवरील पादचारी मार्ग नागरिकांसाठी सीबीएस ते मेहेरदरम्यान वाहनतळ झाला आहे.
शहरात रस्ते साकारताना सामान्यत: पंधरा मीटर रुंदीचे रस्ते असतील तर महापालिका त्यालगत दीड-दीड मीटरचे दोन्ही बाजूने पादचारी मार्ग साकारते. बारा मीटर रस्ता वाहनांसाठी उपलब्ध व्हावा हा त्यामागचा उद्देश आहे. प्रत्यक्षात असा निकष पाळून देखील उपयोग होत नाही.
इन्फो..
काय आढळले लोकमतच्या पाहणीत?
१ स्मार्ट रोड - नाशिक शहरात सर्वाधिक गाजलेल्या स्मार्ट रोडवर पादचारी मार्ग आहे. त्यावर दिव्यांगांना देखील जाण्याची साेय आहे; परंतु येथे दुचाकी उभ्या असतात.
२ एमजी रोड- महात्मा गांधी रोडवर पादचारी मार्ग नसला तरी रस्त्याच्या कडेने पादचाऱ्यांना जाण्यासाठी जागा आहे; परंतु तेथेही दुचाकी लावलेल्या आढळतात.
३ पेठ रोड- झाेपडपट्टीसमोरील रुंद रस्त्यावर पादचारी मार्ग आहे. मात्र, त्यावर कचरा, घाण टाकण्यात येते आणि प्रातर्विधीसाठी वापर केला जातो.
कोट...
कोणत्याही शहरात पादचारी मार्ग करताना नागरिकांना चालण्यासाठीच १.८ मीटर इतकी मोकळी जागा असली पाहिजे. दिव्यांगस्नेही पादचारी मार्ग असले पाहिजेत. पुणे येथे रस्ते कसे असावेत पादचाऱ्यांना त्याचा जास्तीत जास्त कसा वापर करता येईल, त्यासाठी रोड डिझायनरची मदत घेतली जाते. त्यानुसार नियोजन केले तर अधिक सुलभ हाेते.
- हर्षद अभ्यंकर, संचालक, सेव्ह पुणे, ट्राफिक मूव्हमेंट
कोट...
महापालिकेच्या वतीने पंधरा मीटर रस्ता असेल तर पादचारी मार्ग तयार केले जातात. मात्र, पादचाऱ्यांचा विचार करून किमान बारा मीटर रस्ता असेल तरीही त्यालगत पादचारी मार्ग तयार केले जातात. रोडसंदर्भातील नियमांचे अधिकाधिक पालन केले जाते.
- संजय घुगे, शहर अभियंता, महापालिका