पंचवटीमध्ये पादचारी युवकाला लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 03:56 PM2020-01-07T15:56:33+5:302020-01-07T15:58:56+5:30
दम भरत त्याच्या हातातून मोबाइल हिसकावून घेत २ हजारांची रोकड घेत पोबारा केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी अज्ञात संशयितांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
नाशिक : पंचवटी परिसरात गुन्हेगारीच्या घटना सातत्याने सुरूच असून, लूटमारीचे प्रकार थांबता थांबत नसल्याने पोलीस ठाण्याचे गुन्हे शोधपथक, गस्ती पथके, बिट मार्शल नेमकी कोठे अन् कशा पद्धतीने गस्त घालत आहेत, असा संतप्त सवाल पंचवटीकरांनी उपस्थित केला आहे. लागोपाठ सोनसाखळीचोरीच्या घटनानंतर एका पादचारी युवकाला दुचाकीवरून आलेल्या दोघांनी दमबाजी करत मोबाइल, रोकड हिसकावून पोबारा केला.
पंचवटी परिसरातील श्रीराज धर्मशाळेत राहणारा लक्ष्मीनारायण भोलाप्रसाद यादव (२६) हा निमाणी बसस्थानकाकडून रविवारी (दि.५) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मोबाइलवर बोलत पायी मालेगावस्टॅन्डच्या दिशेन जात होता. यावेळी पल्सर दुचाकीवरून (एमएच १५ जीवाय ०४५४) आलेल्या दोघांनी त्याला अडविले. ‘काय रे कुठे राहतो, काय करतो’ असा दम भरत त्याच्या हातातून मोबाइल हिसकावून घेत २ हजारांची रोकड घेत पोबारा केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी अज्ञात संशयितांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. एकूणच लूटमारीच्या अशा घटनांनी प्रभूरामांच्या पंचवटीत गुन्हेगारी प्रवृत्ती फोफावत असल्याचे चित्र आहे. या गुन्हेगारांना वेळीच आवर घातला नाही तर पंचवटीत परराज्यांतून येणाऱ्या भाविक पर्यटकांचीदेखील मोठी लूट या गुन्हेगारांकडून होण्याचा धोका आहे. यादव यांनी अंधारात रात्री च्यावेळीदेखील लुटारूंच्या गाडीचा प्रकार व क्रमांकदेखील पूर्णपणे सूक्ष्मरीत्या बघून तो पोलिसांना दिला आहे. यामुळे आता पोलिसांना गुन्हेगारांचा माग काढणे सोपे झाले आहे, मात्र ते कितपत गांभीर्याने घेतात ते येत्या क ाही दिवसांत दिसून येईल. या लुटारूंना ताब्यात घेतल्यास कदाचित सोनसाखळीचोरीचे यापूर्वी घडलेले गुन्हे किंवा अशाप्रकारचे जबरी लुटीचे गुन्हेदेखील उघडकीस येऊ शकतात.