बालरोगतज्ज्ञांचा जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:15 AM2021-05-26T04:15:43+5:302021-05-26T04:15:43+5:30
नाशिक : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव बालकांवर होणार असल्याच्या शक्यतेनुसार जिल्ह्यातील बालरोग तज्ज्ञांच्या कृती दलाने जिल्हाधिकारी सूरज मांढरे ...
नाशिक : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव बालकांवर होणार असल्याच्या शक्यतेनुसार जिल्ह्यातील बालरोग तज्ज्ञांच्या कृती दलाने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची भेट घेऊन त्यांना उपाययोजना आणि नियंत्रणाबाबतचा अहवाल सादर केला. या लाटेत बालकांच्या मानसिक स्वास्थावर विशेष भर देण्यात आला आहे.
नाशिक बालरोग तज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र सोनवणे यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन तिसऱ्या लाटेसंदर्भात चर्चा केली. तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे वैद्यकीय क्षेत्रात बोलले जात असल्याने या प्रसंगाला तोंड देण्यासाठी तत्काळ करावयाच्या उपाययोजनांवर तज्ज्ञ डॉक्टरांनी अहवाल तयार केला आहे. त्यानुसार या संकटाच्या काळात कोणत्या उपायोजना कराव्या लागतील यासाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात आला असून या पथकाने हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. अहवालात मुलांची मानसिक स्वास्थाच्या दृष्टीने तसेच गृहविलगीकरणात असताना विशेष खबरदारी घेण्याचे सुचविण्यात आले आहे.
डॉ. रवींद्र सोनवणे यांनी नाशिक शहर आणि जिल्ह्यातील बालरुग्णांच्यासाठी उपलब्ध पायाभूत सुविधांची माहिती दिली, डॉ. पंकज गाजरे यांनी एकूण रुग्ण किती असतील किंवा काय सुविधा लागू शकतील याची कल्पना दिली. डॉ. मिलिंद भराडिया आणि डॉ. रमाकांत पाटील यांनी कोविड आणि कोविडेत्तर अशी विभागणी करणे व्यवहार्य नाही असा मुद्दा मांडला. आयएमए महाराष्ट्र राज्य कृती समिती अध्यक्ष डॉ. राजेंद्र कुलकर्णी यांनी काही काळात विशेष काळजी घेऊन शाळा सुरू करणे कसे आवश्यक आणि शक्य होऊ शकते या विषयी मत मांडले. बालरोग तज्ज्ञ संघटनेचे राज्य सचिव डॉ. सदाचार उजलांबकर यांनी ग्रामीण आणि निमशहरी भागातील डॉक्टरांचा राज्य कृती दलात समावेश असावा, अशी मागणी केली.
या कोविड कृती दलामध्ये अध्यक्ष आणि डॉ. पवार वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोग चिकित्सा विभागाचे विभागप्रमुख डॉ.रवींद्र सोनवणे, डॉ.सदाचार उजळंबकर, डॉ.रमाकांत पाटील, डॉ.राजेंद्र कुलकर्णी माजी केंद्रीय उपाध्यक्ष डॉ.केदार माळवतकर, डॉ.शर्मिला कुलकर्णी, डॉ.वैभव पुस्तके, डॉ.मिलिंद भराडिया, डॉ.पंकज गाजरे, डॉ.संदीप वासनकर, डॉ.संजय आहेर, डॉ.सुशील पारख, डॉ.प्रशांत कुटे, डॉ.अमोल मुरकुटे, सह सचिव डॉ.अक्षय पाटील, खजिनदार डॉ.गौरव नेरकर आदी सदस्यांचा समावेश आहे.