ममदापूर राखीव संवर्धन क्षेत्रात काळवीटच्या उड्या
By Admin | Published: May 25, 2017 04:08 PM2017-05-25T16:08:59+5:302017-05-25T18:52:25+5:30
नाशिक वनविभाग पुर्वच्या हद्दीमधील ममदापूर राखीव संवर्धन क्षेत्रात काळवीटच्या संख्येत पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली
अझहर शेख / आॅनलाइन लोकमत
नाशिक, दि. 25 - येवला तालुक्यातील नाशिक वनविभाग पुर्वच्या हद्दीमधील ममदापूर राखीव संवर्धन क्षेत्रात काळवीटच्या संख्येत पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सुमारे साडेपाच हजार हेक्टरवर असलेल्या या राखीव वनक्षेत्रात काळवीटच्या उड्या वाढल्याने शुभ वर्तमान मानले जात आहे.
ममदापूर संवर्धन राखीव जंगलात हरणाच्या काळवीट प्रजातीची संख्या एक हजाराच्या पुढे गेली आहे. पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात झालेल्या प्रगणनेअंतर्गत सुमारे एक हजार ४२ काळवीट आढळून आले आहेत. गतवर्षाच्या तुलनेत पंधरा ते वीस टक्क्यांनी काळविटांच्या संख्येत वाढ झाल्याचे वनविभागाच्या सुत्रांनी सांगितले.
नाशिकच्या येवला तालुक्यातील ममदापूर, राजापूर, देवदरी, खरवंडी, सोमठाण, रेंदळे या गावांच्या परिसरात विस्तारलेले जंगल काळविटांसाठी प्रसिद्ध आहे. काळविटांची संख्या वाढण्यासाठी त्यांना पोषक असे वातावरण व योग्य त्या सोयी उपलब्ध करून देण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. संपूर्ण संवर्धन क्षेत्रात ठिकठिकाणी वनविभागाच्या वतीने पाणवठे तयार करण्यात आले आहे.