जंगलतोड करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 05:43 PM2018-12-02T17:43:02+5:302018-12-02T17:43:46+5:30
सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील मारूतीचा मोढा परिसरात जंगलतोड करणा-यांवर वनविभागाच्या वतीने कारवाई करून दंड वसूल करण्यात आला. ठाणगाव येथे शनिवार (दि. १) रोजी रात्री सातच्या सुमारास वनविभागाच्या कर्मचा-यांनी जंगलात पाहणी करून जंगलतोड करणा-यांवर कारवाई केली.
मारूतीचा मोढा भागातील शिवाची नळी परिसरात गेल्या काही दिवसापासून बिबटयाची दहशत पसरली आहे. वनविभागाच्या वतीने परिसरात पाहणी करण्यासाठी आलेले वनपाल डी. व्ही. तुपलोंढे, वनरक्षक किरण गोर्डे यांच्यासह वनमजूर काशिनाथ कातोरे व भरत गांगड यांनी ही मोहीम राबविली. रात्रीच्या सुमारास जंगलात पाहणी करत असताना जंगलतोड करणा-या चार महीलांना समज देवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्या महीलांकडे जंगलातील वाळलेले लाकडे होती. त्यांच्याकडून एकहजार रूपये दंड वसूल करण्यात आला. जंगलतोड करणारे लोक दिवसभर लाकडे तोडून ठेवतात व तीन -चार दिवस तेथेच ठेवून लाकडे सुकल्यावर घेऊन जातात. ठाणगाव परिसरातील उंबरदरी धरण, वाकलदरा, शिवाची नळी, लावदरी आदी ठिकाणी जंगल तोड मोठया प्रमाणावर होत असून वनविभागाने या परिसरात गस्त घालण्याची मागणी होत आहे.त्यामुळे जंगलतोडीला आळा बसेल. ज्या भागात जंगल तोड होत असते त्याच भागात बिबटयाच्या जोडीचे वास्तव्य आहे. तरीदेखील जंगलतोड याच भागात होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.