घनकचरा विलगीकरण न केल्यास दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 12:23 PM2018-03-27T12:23:00+5:302018-03-27T12:23:00+5:30
नाशिक महापालिकेचा इशारा : पाचशे ते दहा हजार रुपये दंडाची वसुली
नाशिक - नाशिककरांना येत्या १ एप्रिलपासून ओला व सुका कचरा वेगवेगळा करून घंटागाडीत टाकावा लागणार आहे. अन्यथा, नागरिकांकडून ५०० रुपये तर व्यावसायिकांकडून तब्बल १० हजार रुपयांचा दंड वसुल केला जाणार आहे. याशिवाय, जे नागरिक अथवा व्यावसायिक घनकचरा विलगीकरण करणार नाहीत, त्यांचा कचरा येत्या १५ एप्रिलपासून घंटागाडीत स्वीकारला जाणार नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत महाराष्ट शासनाने सर्व महापालिकांना ३१ मार्चपर्यंत घनकचरा विलगीकरणाकडे लक्ष केंद्रीत करण्याचे निर्देश दिले आहेत. महापालिकांनी ८० टक्क्यांपर्यंत घनकचऱ्याचे विलगीकरण केले नाही तर सर्व प्रकारची शासकीय अनुदाने रोखण्याचा इशारा दिला आहे. नाशिकमध्ये घनकच-याचे विलगीकरणाचे प्रमाण अवघे २५ ते ३० टक्के असल्याचा दावा खुद्द महापालिकेचेच अधिकारी करत आले आहेत. मात्र, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ओला व सुका कचरा विलगीकरणाबाबत गांभीर्याने घेतले असून येत्या १ एप्रिलपासून जे नागरिक ओला व सुका कचरा स्वतंत्ररित्या घंटागाडीत टाकणार नाहीत, त्यांना ५०० रुपये तर व्यावसायिकांना १० हजार रुपये दंड ठोठावला जाणार आहे. १५ एप्रिलपर्यंत जे नागरिक अथवा व्यावसायिक वर्गीकरण करुन स्वतंत्रपणे कचरा घंटागाडीत टाकणार नाहीत, त्यांचा कचरा न स्वीकारण्याचे महापालिकेने ठरविले आहे. त्यामुळे, नागरिकांना ओला कचरा हा कागदी पिशवी अथवा वेष्टनाद्वारे तर सुका कचरा स्वतंत्र कचरादाणीतून घंटागाडीत टाकणे क्रमप्राप्त ठरणार आहे.
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास दंड
महापालिकेने घनकचरा विलगीकरणाबरोबरच शहरात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे अथवा रस्त्यावर घाण करणे, लघुशंका अथवा उघड्यावर शौचविधी करणे यासाठीही दंड आकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, पालपाचोळा, प्लॅस्टिक, सर्व प्रकारचा कचरा, रबर आदी जाळल्यास त्याकरीता ५ हजार रुपये, मोठ्या प्रमाणात सर्व प्रकारचा कचरा जाळल्यास त्याकरीता २५ हजार रुपये, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास १० हजार रुपये, रस्त्यांवर घाण केल्यास १८० रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १५० रुपये, उघड्यावर लघुशंका केल्यास २०० रुपये तर उघड्यावर शौच केल्यास ५०० रुपये दंड वसूल केला जाणार आहे.