कार्यालयातील विनामास्क कर्मचाऱ्यांनाही दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:22 AM2021-02-23T04:22:28+5:302021-02-23T04:22:28+5:30
सिडको : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विनामास्क फिरणाऱ्यांविरुद्धच्या मोहिमेत सिडको विभागीय अधिकाऱ्यांनी आपल्याच कार्यालयापासून सुरुवात केली. कार्यालयात विनामास्क ...
सिडको : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विनामास्क फिरणाऱ्यांविरुद्धच्या मोहिमेत सिडको विभागीय अधिकाऱ्यांनी आपल्याच कार्यालयापासून सुरुवात केली. कार्यालयात विनामास्क आढळलेल्या तीन कर्मचाऱ्यांवर विभागीय अधिकाऱ्यांनी दंडात्मक कारवाई केली.
शहरात कोरोना रुग्णांचा झपाट्याने प्रसार होत असल्याने, मास्क न घालणाऱ्यांना हजार रुपयांचा दंड आकारण्याचे पालकमंत्र्यांनी आदेश दिले. नागरिकांकडून दंड वसूल करण्याआधी सिडकोतील मनपा विभागीय अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयापासूनच मोहिमेला सुरुवात केली. विभागीय अधिकारी डॉ.मयूर पाटील यांनी कार्यालयातील प्रत्येक दालनात फेरफटका मारत, मास्क न घालणाऱ्या तिघा कर्मचाऱ्यांना हजार रुपये दंड भरण्याच्या नोटिसा बजावल्या.
लग्न समारंभ, तसेच सार्वजनिक कार्यक्रमांमुळे शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढल्याने ही चिंतेची बाब असल्याने, प्रशासनाने मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. महापालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्तरीत्या मोहीम राबविण्याचे आदेशही दिले.
मनपाच्या सिडको विभागीय अधिकाऱ्यांनी मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करीत मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयापासूनच मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याअगोदर त्यांनी स्वतःच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्याने, याबाबत महापालिका वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. विभागीय अधिकाऱ्यांनी सोमवारी कार्यालयात हजर होताच, अचानकपणे कर्मचाऱ्यांच्या कामकाजाच्या दालनात पाहणी केली. या पाहणीत तिघा कर्मचाऱ्यांनी मास्क न घातल्याने, त्यांनी तत्काळ तीनही कर्मचाऱ्यांना एक हजार रुपये दंड भरण्याची नोटीस बजाविल्याचे मनपाच्या वतीने सांगण्यात आले.