बॅग ‘कॅरी’ करणाऱ्यांना साडेतीन लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 12:42 AM2018-06-24T00:42:31+5:302018-06-24T00:42:45+5:30
नेहमीच्या व्यवहारातील प्लॅस्टिक बॅग कॅरी करण्यास राज्य शासनाने मज्जाव केल्यानंतर महापालिकेच्या वतीने पहिल्याच दिवशी कारवाईचा धडाका लावण्यात आला आणि दिवसभरात ७२ जणांकडून ३ लाख ६० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
नाशिक : नेहमीच्या व्यवहारातील प्लॅस्टिक बॅग कॅरी करण्यास राज्य शासनाने मज्जाव केल्यानंतर महापालिकेच्या वतीने पहिल्याच दिवशी कारवाईचा धडाका लावण्यात आला आणि दिवसभरात ७२ जणांकडून ३ लाख ६० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे बाजारपेठेतून साडेतीनशे किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले.
शासनाच्या या निर्णयामुळे अनेक व्यापारी, विक्रेत्यांचे हाल झाले. कपडे, बॅग आणि अन्य साहित्य प्लॅस्टिकच्या आवरणातून काढावे लागल्याने हा माल खराब झाला. तर दुसरीकडे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत प्लॅस्टिक बंदीविरुद्ध महापालिकेने कारवाई सुरू केल्याने व्यापाºयांनी दीड तास लिलाव बंद ठेवले. नाशिकच्या बाजार समितीतून मुंबई येथे मोठ्या प्रमाणात भाजीपाला पाठविण्यात येतो. त्यामुळे माल पाठवायचा कसा, असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेरीस खोक्यांमध्ये भाज्या पाठविण्यात आल्या. राज्य शासनाने प्लॅस्टिकबंदी केल्यानंतर त्यात प्लॅस्टिक व्यापाºयांवर कारवाई न करता अन्य व्यापारी आणि दुकानदारांवर ती करण्यात आली होती; मात्र शनिवारपासून (दि. २३) महापालिकेने सर्वसामान्य नागरिकांवरदेखील कारवाईचा बडगा उगारला आहे. या प्रकारामुळे नाशिकच्या बाजारपेठेत संभ्रम आणि कारवाईचे सावट होते. कापड दुकान, बॅगा आणि तत्सम साहित्य धुळीपासून वाचविण्यासाठी प्लॅस्टिक बॅगमध्ये ठेवण्यात येतात; परंतु त्यांना प्लॅस्टिकचे आवरण काढून ठेवावे लागले, त्यामुळे अनेकांच्या वस्तूंवर धूळ बसली तर रस्त्यावर माल विकणाºयांची पावसामुळे अडचण झाली.
दिवसभर बाजारात कोणत्या प्रकारचे प्लॅस्टिक वापरता येईल याविषयी खल सुरू होता. अनेकांनी जुन्या कापडी पिशव्यांचा वापर सुरू केला आहे. अशा स्थितीत महापालिकेने कारवाईचा दणका सुरू केला आणि चौथा शनिवार हा सुटीचा दिवस असतानादेखील कारवाई करण्यात आली. महापालिकेने सहा विभागात सहा पथके कारवाईसाठी नियुक्त केली होती. बाजारपेठा, व्यावसायिक संकुले अशा विविध भागात कर्मचाºयांनी कारवाईचा धडाका लावला.
नागरिकांनी प्लॅस्टिकचा वापर टाळावा
पूर्व विभागात १४ वापरकर्त्यांकडून ७० हजार रुपये, पश्चिम विभागात १५ जणांकडून ७५ हजार, नाशिकरोड विभागात १२ जणांकडून ६० हजार, पंचवटी विभागातून १६ जणांकडून ८० हजार, सातपूर विभागात पाच जणांकडून २५ हजार, सिडको विभागात १० जणांकडून ५० हजार याप्रमाणे ७२ जणांकडून ३ लाख ६० हजार रुपये असा दंड वसूल करण्यात आला आहे. याशिवाय प्लॅस्टिकबंदीच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असून, नागरिकांनी प्लॅस्टिकचा वापर टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.