मुक्त विद्यापीठाच्या प्रलंबित परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:19 AM2021-06-16T04:19:18+5:302021-06-16T04:19:18+5:30
नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर परीक्षा लांबल्या असून या लांबलेल्या परीक्षा २० पासून ...
नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर परीक्षा लांबल्या असून या लांबलेल्या परीक्षा २० पासून सुरू होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील संभाव्य वेळापत्रक जून अखेरपर्यंत किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून देण्यात आली आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील अंतिम परीक्षा मे-जून २०२० मध्ये होणार होत्या. परंतु कोरोना संकटामुळे या परीक्षा पुढे ढकलून ऑक्टोबर २०२० मध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. ४ नोव्हेंबरपर्यंत या परीक्षा पूर्ण झाल्यानंतर परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. परंतु, त्यानंतर एका महिन्याच्या कालावधीत डिसेंबर २०२० मध्ये सत्र परीक्षा घेणे शक्य नसल्याने त्या मार्चमध्ये घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र मार्चमध्ये पुन्हा कोरोनाचा प्रकोप वाढल्याने या परीक्षा मे २०२१ मध्ये या परीक्षा घेतल्या आहे. त्यामुळे दरवर्षी नियमितपणे मे-जूनमध्ये होणाऱ्या परीक्षाही लांबणीवर पडल्या असून आता या परीक्षा जुलैच्या मध्यावधीत सुरू होणार असल्याची माहिती परीक्षा विभागाकडून देण्यात आली आहे. त्यासाठी जून अखेर अथवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात संभाव्य वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी संकेतस्थाळावर दिल्या जाणाऱ्या सूचनांनुसार परीक्षांची तयारी करावी, असे आवाहन विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक शशिकांत ठाकरे यांनी दिली आहे.