लिंग निदान करणाऱ्या घोटीतील डॉक्टरला शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 06:43 PM2020-02-21T18:43:20+5:302020-02-21T18:44:07+5:30
लिंग निवडीस प्रतिबंध कायद्याअंतर्गत घोटी येथील डॉ. प्रवीण निकम यांना इगतपुरी न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा व दहा हजारांचा दंड सुनावला.
इगतपुरी : लिंग निवडीस प्रतिबंध कायद्याअंतर्गत घोटी येथील डॉ. प्रवीण निकम यांना इगतपुरी न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा व दहा हजारांचा दंड सुनावला.
इगतपुरी तालुका न्यायालयाच्या मुख्य न्यायधीश श्रीमती आर. एन. खान यांनी लिंग निवडीस प्रतिबंध कायदा अधिनियम सन २००३ च्या तरतुदीचे कलमाअंतर्गत तालुक्यात पहिलाच गुन्हा सिद्ध करीत घोटी येथील डॉ. प्रवीण मोतीराम निकम यांना लिंग निवडीस प्रतिबंध कायद्याअंतर्गत तीन वर्षांची शिक्षा व दहा हजारांचा दंड सुनावल्याने तालुक्यातील डॉक्टरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
इगतपुरी तालुक्यात ११ सष्टेंबर २०१८ रोजी लिंग निवडीस प्रतिबंधकामी जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या धडक मोहिमेत घोटी येथील मानसी डायग्नोस्टिक सेंटर येथे धाडसत्र मोहीम राबविली होती. यावेळी घोटी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. संजय सदावर्ते यांच्या लिंग निवडीबाबत काही पुरावे लक्षात येताच त्यांनी मानसी डायग्नोस्टिक सेंटरचे डॉ. प्रवीण निकम यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते. संबंधित गुन्ह्यातील न्यायालयीन कामकाज सरकारी विशेष साहाय्य अभियोक्ता अॅड. रेश्मा युवराज जाधव व विधि समुपदेशक आरोग्य विभागाच्या अॅड. सुवर्णा शेफाळ यांनी काम पाहिले. आरोपीने आदेशित न्यायालयीन दंड न भरल्यास आरोपीला एक महिन्याचा साध्या कारावासाची शिक्षाही यावेळी सुनावण्यात आली. सर्वोच्य न्यायालयाच्या निर्देशानुसार एक वर्षाच्या आत या केसचा निकाल लागला असल्याची माहिती अॅड. रेश्मा जाधव यांनी दिली. यावेळी वकील संघाचे अॅड. युवराज जाधव, अॅड. सुवर्णा शेफाळ, पोलीस हवालदार एस. टी. थोरात आदी उपस्थित होते.
न्यायालयात सबळ पुरावे
डॉ. प्रवीण निकम यांच्याविरुद्ध सबळ पुरावा सरकारी पक्षाने आणल्याने तो न्यायालयाने मान्य केल्याने सदर गुन्ह्यात आरोपीस शिक्षा फर्माविण्यात आली, अशी माहिती अॅड. रेश्मा जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.