जवाब दो, असा नारा देत पेन्शन धारक रस्त्यावर
By Sandeep.bhalerao | Published: December 20, 2023 05:16 PM2023-12-20T17:16:12+5:302023-12-20T17:16:25+5:30
या आंदोलनात मोठ्या संख्येने फेडरेशनचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
नाशिक: खोटे आश्वासन देऊन गेल्या दहा वर्षांपासून ईपीएफ(९५) पेन्शनधारकांची फसवणूक केल्याचा आरोप करीत ईपीएफ फेडरेशनच्यावतीने जवाब दो, जवाब दो अशी घोषणाबाजी करीत बुधवारी (दि.२०) त्र्यंबकरोड सिग्नलवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने फेडरेशनचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
तत्कालीन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ईपीएफ (९५) पेन्शनधारकांना किमान पेन्शन देण्याची आणि मोफत उपचारासी सुविधा देण्यासंदर्भात घोषणा केली होती. या आश्वासनाला दहा वर्ष झाली मात्र या संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याने पेन्शनर्स आक्रामक झाले आहेत. केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी ईपीएफ (९५) फेडरेानच्यावतीने संपुर्ण भारतभर आंदोलन करण्यात आले. त्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी आंदोलन छेडले.
सकाळी ११ वाजता सुरू झालेले आंदोलन सुमारे पाऊणतास सुरू होते. यावेळी पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केल्याने काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती. आंदोलनात जवाब दो, जवाब दो, पेन्शन आमच्या हक्काची, आश्वासन न पाळणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशी घेाषणाबीजी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी पांढरी टोपी परिधान करून ‘त्यावर ईपीएफ-९५)असे लिहले होते.