दहा हजारांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकासह शिपाई जाळ्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 01:41 AM2021-11-25T01:41:28+5:302021-11-25T01:42:36+5:30
कधी गुन्हेगारीमुळे तर कधी भ्रष्टाचारामुळे अंबड पोलीस ठाणे मागील काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहे. पोलीस ठाणेस्तरावर जामीन रद्द करण्यासाठी एका संशयित महिलेकडून पंधरा हजारांची लाचेची मागणी करत तडजोडीअंती पोलीस ठाण्यातच दहा हजारांची रक्कम घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पोलीस उपनिरीक्षकासह एका शिपायाला रंगेहाथ बुधवारी (दि. २४) ताब्यात घेतले. उपनिरीक्षक कैलास आनंदा सोनवणे ( ५७ रा. खांडे मळा, सिडको) व पोलीस शिपाई दीपक बाळकृष्ण वाणी (३२, रा. उत्तमनगर, सिडको) अशी संशयित पोलिसांची नावे आहेत.
नाशिक : कधी गुन्हेगारीमुळे तर कधी भ्रष्टाचारामुळे अंबड पोलीस ठाणे मागील काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहे. पोलीस ठाणेस्तरावर जामीन रद्द करण्यासाठी एका संशयित महिलेकडून पंधरा हजारांची लाचेची मागणी करत तडजोडीअंती पोलीस ठाण्यातच दहा हजारांची रक्कम घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पोलीस उपनिरीक्षकासह एका शिपायाला रंगेहाथ बुधवारी (दि. २४) ताब्यात घेतले. उपनिरीक्षक कैलास आनंदा सोनवणे ( ५७ रा. खांडे मळा, सिडको) व पोलीस शिपाई दीपक बाळकृष्ण वाणी (३२, रा. उत्तमनगर, सिडको) अशी संशयित पोलिसांची नावे आहेत.
डीजीपीनगर भागातील रहिवासी असलेल्या एका संशयित महिलेवर अंबड पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी महिलेने न्यायालयात धाव घेतल्याने तिला न्यायालयातून अंतरिम जामीन मंजूर झाला. जामिनाची प्रक्रिया पोलीस ठाणेस्तरावर पूर्ण करण्यासाठी संशयित तक्रारदार महिलेने पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली असता त्यांनी १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र, तडजोडीअंती दहा हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागात महिलेने तक्रार दाखल केली. विभागाने तक्रारीची खात्री पटविल्यानंतर बुधवारी संध्याकाळी अंबड पोलीस ठाण्यातच सापळा रचला. दोघा संशयितांपकैी शिपाई वाणी याने पंचासमक्ष दहा हजारांची लाच स्वीकारली असता दबा धरून असलेल्या पथकाने त्यास ताब्यात घेतले. ज्या पोलीस ठाण्यात ‘कर्तव्य’ बजावत होते, त्याच पोलीस ठाण्यात दोघा पोलिसांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.
--इन्फो--
एकीकडे गुन्हेगारी तर दुसरीकडे बोकाळला भ्रष्टाचार
एकीकडे अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातत्याने गंभीर स्वरूपाची वाढती गुन्हेगारी तर दुसरीकडे बोकाळणारा भ्रष्टाचार यामुळे अंबड पोलीस ठाण्याची प्रतिमा कमालीची शहरात बिघडत आहे. मात्र, या पोलीस ठाण्याच्या कामकाजात तसूभरही सुधारणा होताना दिसत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. खून, हाणामाऱ्या, चेनस्नॅचिंग, प्राणघातक हल्ले, घरफोड्यांसारख्या गुन्ह्यांनी अंबड पोलीस ठाण्यांच्या हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना जेरीस आणले आहे. असे असतानाही बुधवारी चक्क एका उपनिरीक्षकासह शिपायाने गुन्ह्यातील संशयित महिलेकडूनच लाचेची रक्कम घेण्याचे धाडस दाखविल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.