नाशिककर जनता प्रामाणिक लोकांना सांभाळणारी आबांनी केले होते दिंडोरीच्या जनतेचे कौतुक, कादवाची भेट ठरली अखेरचीच
By admin | Published: February 17, 2015 12:22 AM2015-02-17T00:22:15+5:302015-02-17T00:22:44+5:30
नाशिककर जनता प्रामाणिक लोकांना सांभाळणारी आबांनी केले होते दिंडोरीच्या जनतेचे कौतुक, कादवाची भेट ठरली अखेरचीच
नाशिक : कादवा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ माजी उपमुख्यमंत्री आमदार आर. आर. आबांच्या हस्ते बरोबर १०८ दिवसांपूर्वी म्हणजेच ३१ आॅक्टोबर २०१४ रोजी झाला होता. आबांची ती नाशिकची भेट अखेरचीच भेट ठरली. आबांनी त्यानंतर लगोलग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या शपथविधीला हजेरी लावली होती.
आबांचे नाशिकशी संबंध नेहमीच सलोख्याचे व स्नेहाचे राहिले आहेत. ग्रामविकासमंत्री असल्यापासून ते उपमुख्यमंत्री व गृहमंत्री होईपर्यंत आबांचे नाशिकला सातत्याने येणे-जाणे होते. नाशिकमधील सहकार क्षेत्रातील एकमेव नफ्यात असलेल्या कादवा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ दिंडोरीचे स्वामी समर्थ केंद्राचे अण्णासाहेब मोरे यांच्या अध्यक्षतेखाली व आर आर. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ३१ आॅक्टोबर २०१४ रोेजी झाला. कार्यक्रमास कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे,आमदार नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रकाश वडजे, जिल्हा बॅँकेचे माजी संचालक गणपतराव पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. त्यावेळी बरोबर दुपारी एक वाजता आबांचे कादवा साखर कारखान्यावर तयार केलेल्या हेलिपॅडवर हेलिकॉप्टरने आगमन झाले. कादवा गळीत हंगामाच्या शुभारंभाप्रसंगी आबांनी अतिशय भावस्पर्शी व हृदयस्पर्शी भाषण करीत उपस्थितांची दाद मिळविली होती. देशभरात असलेल्या मोदी लाटेच्या विरोधात मनमिळावू व प्रामाणिक अशा आमदाराची निवड दिंडोरी विधानसभा मतदारसंघातील जनतेने केली. येथील लोक प्रामाणिक माणसांना सांभाळून घेतात. या निवडणुकीत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर मतांसाठी अर्थकारण केले जात असताना दिंडोरी येथील जनतेने मात्र नरहरी झिरवाळ यांच्यासारख्या उमेदवाराला मतेही दिली आणि वर्गणी काढून पैसेही दिले. येथील जनता प्रामाणिक लोकांना सांभाळणारी असल्याचे आर. आर. पाटील यांनी आपल्या भाषणात आवर्जून नमूद केले होते. तब्बल ४५ मिनिटांच्या भाषणात आबांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला होता. कार्यक्रमानंतर दुपारी अडीच्या सुमारास लगेचच आबा मुंबईला फडणवीस सरकारच्या शपथविधीसाठी गेले होते. शपथविधीनंतर विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी आबा उपस्थित होते. त्यानंतर लगेचच आबांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते. त्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमात आबांनी हजेरी लावली नाही. नाशिकच्या कादवा साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा सार्वजनिक कार्यक्रम बहुधा आबांचा शेवटचाच ठरला. दिंडोरीसह नाशिककरांना आबांची अशी ‘एक्झिट’ मनाला चटका लावणारी ठरली.(प्रतिनिधी)