नाशिकमध्ये रंगोत्सवासाठी उसळला जनसागर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 06:04 PM2022-03-22T18:04:47+5:302022-03-22T18:05:38+5:30
Nashik News: तब्बल पावणे दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे निर्बंधात अडकून पडलेले नाशिककर अखेर निर्बंधमुक्त झाले आणि रंगपंचमीला नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागात अक्षरश:जनसागर उसळला. रहाडी आणि रेनडान्समध्ये अवघे नाशिककर मंगळवारी (दि.२२) न्हावून निघाले.
नाशिक - तब्बल पावणे दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे निर्बंधात अडकून पडलेले नाशिककर अखेर निर्बंधमुक्त झाले आणि रंगपंचमीला नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागात अक्षरश:जनसागर उसळला. रहाडी आणि रेनडान्समध्ये अवघे नाशिककर मंगळवारी (दि.२२) न्हावून निघाले.नाशिक मध्ये रंगपंचमीच्या दिवशी रंगोत्सव खेळण्याची परंपरा आहे. मात्र दोन वर्षांपासून कोरोनामुळे बंधने येत हेाती.
यंदा कोरोना रूग्णांची संख्या नगण्य झाली. परंतु गेल्या शनिवारी (दि.१९) नाशिक शहरातील निर्बंध जिल्हाधिकाऱ्यांनी हटवले. त्यामुळे रंगोत्सवाचा आनंद व्दीगुणीत झाला. त्यातच पोलीस प्रशासनाने पेशवेकालीन रहाडीत रंगोत्सव खेळण्यास परवानगी दिली आणि त्यामुळे यंदा सार्वजनिक रंगोत्सव जोमाने सुरू झाला. शनि चौक, दिल्ली दरवाजा आणि तिवंधा येथील पेशवेकालीन रहाडी (हौद) खोदल्यानंतर त्यांची दुपारी मानकऱ्यांच्या हस्ते विधीवत पुजा करण्यात आली. आणि नैसर्गिक रंगात धप्पा मारण्याचा (उड्या) आनंद मनसोक्त लुटत नाशिककरांनी रंगपंचमी साजरी केली.
त्याच बरोबर मध्य नाशिकमध्ये ठिकठिकाणी सार्वजनिक मित्र मंडळांनी कलर शॉवर आणि रेनडान्सची व्यवस्था केल्याने उपनगरातील युवक युवतींसह अवघे नाशिक मध्यवर्ती भागात लोटले होते. त्यामुळे अक्षरश: गर्दीत पाऊल ठेवायला जागा नव्हती. रंगात न्हाऊन निघालेल्या अनेक नाशिककरांनी गोदापात्रात स्नान केल्याने कुंडांचा रंगही बदलून गेला होता.