संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी लोकांनी जबाबदारी ओळखावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:15 AM2021-05-08T04:15:31+5:302021-05-08T04:15:31+5:30
नाशिक दौऱ्यावर आलेल्या यशोमती ठाकूर यांनी काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संपर्क साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, तिसरी ...
नाशिक दौऱ्यावर आलेल्या यशोमती ठाकूर यांनी काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संपर्क साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, तिसरी लाट येणार असल्याचा अंदाज वर्तविला जात असला तरी ती नेमकी कशी येणार, हे माहिती नाही; परंतु लहान मुलांना त्याचा अधिक धोका राहील, असे बोलले जात आहे. हा अंदाज कशाच्या आधारे वर्तविला जातो आहे, याचा मला अंदाज नाही; परंतु कोविडपासून बचावासाठी नागरिकांना प्रशिक्षित करावे लागेल. स्वतःलाच स्वतःची जबाबदारी घ्यावी लागेल. त्रास झाला तर तातडीने सांगणे आवश्यक आहे; परंतु अजूनही लोक याबाबत फारसे गंभीर नसल्यामुळे धोका वाढत असल्याचे ठाकूर म्हणाल्या.
कोरोना काळात आई- वडील गमावल्यामुळे अनाथ झालेल्या बालकांना दत्तक देण्या-घेण्याबाबत समाजमाध्यमांवर आवाहन केले जात आहे. हा सारा प्रकार बेकायदेशीर असून, बालकांच्या दत्तक प्रक्रियेबाबत जनजागृती आवश्यक आहे. असे प्रकार घडत असतील, तर त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. राज्यात अशा प्रकारे बालके दत्तक घेण्याचे प्रकार घडले असल्याची कबुलीही त्यांनी दिली. कुमारी मातांचे प्रश्न सोडविण्यासाठी सामाजिक बदल घडवावा लागणार असून, त्याचा प्रयोग यवतमाळमध्ये यशस्वी झाल्यास त्याची राज्यभर अंमलबजावणी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. निर्भया फंड केवळ मुंबईसाठी नाही, तर प्रत्येक जिल्ह्यासाठी मिळायला हवा, अशी मागणी केंद्र सरकारकडे केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, डॉ. हेमलता पाटील आदींंची उपस्थिती होती.