‘जनता कर्फ्यू’ सरकारची भूमिका नाही ; लॉकडाऊन अशक्यच, व्यापाऱ्यांनी निर्णय घ्यावा : भुजबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 05:18 PM2020-06-26T17:18:35+5:302020-06-26T17:27:14+5:30
पुन्हा लॉकडाऊन करणे अशक्य आहे. व्यापारी संघटना आपापल्या पातळीवर निर्णय घेऊ शकतात; मात्र जनता कर्फ्यू करणे याला सरकारचे समर्थन असू शकत नाही अशी ठाम भूमिका पालकमंत्र्यांनी मांडली आहे.
नाशिक: शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करावा, अशी मागणी विविध व्यापारी संघटनांकडून केली जात असली तरी आता पुन्हा लॉकडाऊन करणे अशक्य आहे. व्यापारी संघटना आपापल्या पातळीवर निर्णय घेऊ शकतात; मात्र जनता कर्फ्यू करणे याला सरकारचे समर्थन असू शकत नाही अशी ठाम भूमिका पालकमंत्र्यांनी मांडली. दुकाने बंद करण्यासाठी राजकीय दबाव आणणे आयोग्य असल्याचेदेखील त्यांनी यावेळी सांगितले.
कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता महाराष्ट्र चेंबरऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेच्या यांच्या नेतृत्वाखालील व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्र्यांची भेट घेऊन लॉकडाऊनची मागणी केली. व्यापाऱ्यांनी सम-विषम तारखेचा नियम रद्द करून सकाळी ९ ते सायंकाळी ५ अशी दुकानांची वेळ करण्याचीदेखील मागणी केली. यावेळी पालकमंत्र्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांशी थेट संपर्क करून याबाबत विचारणा केली असता पुण्यात सम-विषम तारखांचा निर्णय मागे घेण्यात आल्यानंतर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे सम-विषमचा निर्णय मागे घेता येणार नसल्याचे पालकमंत्र्यांनी व्यापाऱ्यांना सांगितले. दुकानांची वेळ आणि गर्दीवरील नियंत्रणासाठी व्यापाऱ्यांच्या संघटनांनी स्वत:हून निर्णय घ्यावेत, सरकार म्हणून कोणतीही घोेषणा केली जाणार नसल्यचा पुनरुच्चार पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केला. दुकाने बंद करण्याबाबत कुणीही राजकारण करू नये, असेही ते म्हणाले. तसेच शहरातील रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी भाजपच्या नेत्यांकडून लॉकडाऊनची मागणी केली जात असल्याचे पालकमंत्र्यांना विचारले असता त्यांनी केंद्राच्या नियमांचे राज्य सरकार पालन करीत असल्याने लॉकडाऊन लागू करावा, असे वाटत असेल तर भाजप नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांना सांगावे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. दरम्यान, पालकमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर व्यापाऱ्यांनी दुकानांची वेळ निश्चित केली आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ अशी वेळ दुकानांसाठी असणार असल्याचे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.