गणेशनगर जिल्हा परिषद शाळेला लोकसहभागातून प्रवेशद्वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 06:01 PM2019-07-07T18:01:15+5:302019-07-07T18:01:55+5:30
सिन्नर : जिल्हा परिषद शाळेत उत्तम प्रकारचे शिक्षण मिळते, शिक्षकांना अशैक्षणिक कामे असतानाही जिल्हा परिषदेचे शिक्षक चांगल्या ज्ञानदानाचे काम करतात व जिव्हाळ्याने शिकवितात, असे मत जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी व्यक्त केले.
सिन्नर शहरातील गणेशनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय प्रवेशद्ववाराच्या भूमीपूजनप्रसंगी सांगळे बोलत होत्या. व्यासपीठावर उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे, नगरसेवक श्रीकांत जाधव, मंगेश परदेशी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विष्णू साबळे, सदस्य सोमनाथ जाधव, राजेंद्र जाधव, विठ्ठल जपे, दत्तात्रय कांदळकर, बाळासाहेब घुगे, योगेश गांजवे, अशोक बागुल, दीपक आनप, भिमाजी सांगळे, औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष पंडित लोंढे, संचालक रामदास दराडे,भारती घंगाळे आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळेच्या डिजीटल क्लासरूमची पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले. समाज सहभागातून १ लाख ५० हजार रूपयांचा निधी जमा करून शालेय कंपाउंड, विद्यार्थ्यांना फिल्टरचे स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले, शालेय सुविधा तसेच नव्याने विविध उपक्रम राबवण्यात असल्याने सांगळे यांनी कौतुक केले. शाळेला येणाऱ्या समस्या सोडवण्याचे आश्वासन सांगळे यांनी यावेळी दिले. लोकसहभागातून निधी उपलब्ध झाल्याने अध्यक्ष सांगळे यांनी ग्रामस्थ व पालकांचे आभार मानले व शिक्षकांच्या कार्यांचा त्यांनी गौरव केला. नगरसेवक जाधव यांनी शालेय प्रगतीचा आलेख मांडला. मारूती आव्हाड यांनी सूत्रसंचालन तर मुख्याध्यापक चिंधू वाघ यांनी आभार मानले.