जनतेच्या उद्रेकामुळे लोकप्रतिनिधींना फुटला घाम !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2022 12:24 AM2022-10-16T00:24:46+5:302022-10-16T00:28:21+5:30
हॉटेल मिरची चौकात झालेल्या अपघातात १२ निष्पाप जिवांचा गेलेला बळी व कळवणला रस्त्याच्या दुरवस्थेने वाहनधारकाने गमावलेले प्राण या दोन घटनांनंतर जनतेने घेतलेली आक्रमक भूमिका, माजी आमदार दाम्पत्याच्या अतिक्रमणाविरोधात सटाण्यात निघालेला मोर्चा, महिरावणीत निकृष्ट काँक्रिटीकरणाचा निषेध म्हणून रस्त्यात केलेले वृक्षारोपण, मालेगावात दोन-चार दिवसाआड नागरी प्रश्नांवर होणारी आंदोलने हा जनतेच्या उद्रेकाचा आविष्कार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सध्या प्रशासक राज आहे. राजकीय पक्ष निवडणुका लांबवत असल्याचा जनसामान्यांचा समज झाला आहे. गावाच्या विकासामध्ये लोकसहभागाच्या तत्त्वाला हरताळ फासला जात असल्याची चीड जनतेमध्ये आहे. ज्याची सत्ता, जो लोकप्रतिनिधी आहे, तो प्रशासनावर प्रभाव टाकून कामे करीत आहे. पण सामान्यांच्या मागण्या, गुणवत्तापूर्ण कामे याकडे सपशेल दुर्लक्ष होत असल्याने सामान्यांमध्ये संताप खदखदत आहे. एखादी घटना घडली की, मग उद्रेक होतो आणि जनता रस्त्यावर येते.
मिलिंद कुलकर्णी

अल्टिमेटम पाळायला हवा
जनसामान्यांची नाडी ओळखण्यात लोकप्रतिनिधी आघाडीवर असतात. सर्वसामान्यांमधील संताप, खदखद ओळखून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विरोधकांसोबत सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी प्रशासनाला धारेवर धरले. आगामी निवडणुकांमध्ये जनतेच्या रोषाचे पडसाद उमटू नये, यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडे वेळेत कामे करण्याचा आग्रह धरला आहे. पालकमंत्र्यांनी आश्वासने दिली, अल्टिमेटम दिला तरी त्याचे पालन व्हायला हवे. बैठक संपली, निर्णयांचा विसर पडला, पुढील बैठकीत इतिवृत्तात त्याची नोंद एवढ्यापुरता विषय मर्यादित राहू नये. नाशकातील अपघातांची केंद्रीय रस्ते वाहतूक विभागापासून पोलीस, महापालिका, आरटीओ सगळ्यांनी दखल घेतली. अशीच दखल नाशिक-मुंबई रस्त्यातील खड्डे बुजविण्याविषयी घेतली गेली पाहिजे. १५ दिवसांत खड्डे न बुजविल्यास खरोखर टोलवसुली बंद व्हायला हवी. नाफेडने जिल्ह्यातच कांदा विकल्याची जिल्हाधिकारी आठवडाभरात चौकशी करणार आहेत. जिल्हा बँकेने थकबाकीदारांच्या ट्रॅक्टर विक्रीची मोहीम सुरू केली असताना बँकेचेच कर्मचारी ट्रॅक्टर विकत घेत असल्याची तक्रार बैठकीत करण्यात आली, त्यातील तथ्य समोर यायला हवे.
अमृतमहोत्सवी वादळ
राजकीय जीवनात वावरताना अनेक वादळे निर्माण करणारे, अनेक वादळे अंगावर झेलणारे आणि त्यातूनही फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेणाऱ्या नेत्यांमध्ये छगन भुजबळ यांचे नाव घ्यावे लागेल. वयाची ७५ वर्षे पूर्ण करीत असताना स्वकीय, स्नेहीजनांचे प्रेम, सदिच्छांचा वर्षाव त्यांच्यावर झाला हा राजकारणातील विरळा अनुभव म्हणावा लागेल. मुंबईत मुख्य सोहळा झाला. शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, फारुक अब्दुल्ला, जावेद अख्तर यांची उपस्थिती आणि भुजबळांविषयी व्यक्त केलेले गौरवोद्गार संस्मरणीय आहे. हा सोहळा विशिष्ट वातावरणात झाला. एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड, महाविकास आघाडी सरकारची शिवसेना शिंदे गट व भाजपच्या सरकारने घेतलेली जागा, त्यानंतर झालेले दोन दसरा मेळावे, अंधेरीची जाहीर झालेली पोटनिवडणूक या पार्श्वभूमीवर हा सोहळा झाला. महाविकास आघाडीचे सर्व नेते व्यासपीठावर उपस्थित राहिल्याने सरकार गेले तरी आघाडी एकत्र आहे, हा संदेश देण्यात यश आले. भुजबळ यांनी नाशिकमध्ये केलेले काम हे विकासपुरुष या प्रतिमेला साजेसे असल्याचे मान्यवर वक्त्यांनी सांगितले.
मालेगाववर राष्ट्रवादीचा फोकस
माजी आमदार रशीद शेख यांच्या नागरी सत्काराला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उपस्थित होते. काँग्रेसमधून राष्ट्रवादीत आलेल्या रशीद शेख व माजी महापौर ताहेरा शेख यांना बळ देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने सातत्याने केला आहे. महाविकास आघाडी सरकार असतानाही महापालिकेला मदत करण्यात आली. आता सरकार नसले तरी पक्ष त्यांच्या पाठीशी उभा असल्याचा संदेश देण्यात आला आहे. मालेगावचे राजकारण त्रिकोणी आहे. पालकमंत्री दादा भुसे, आमदार मौलाना आणि माजी आमदार रशीद शेख यांच्याभोवती राजकारण फिरत आहे. ठाकरेंची शिवसेना, भाजप व काँग्रेसची ताकद अल्प आहे. त्यामुळे या त्रिकोणातील दोन बाजू खुलेपणाने वा पडद्याआड एकत्र येतात आणि समीकरणे तयार होतात, हा आजवरचा अनुभव आहे. इतर पक्ष केवळ पूरक भूमिका निभावतात. यंदाही वेगळे घडण्याची शक्यता कमी आहे.
यंदा रंगणार ह्यपदवीधरह्णचा आखाडा
विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. मतदार नोंदणीसाठी राजकीय पक्षांकडून तसेच प्रशासनाकडून जोरदार मोहीम राबविली जात असली तरी त्याला फारसा प्रतिसाद लाभत नाही. त्याचे कारण काय, याविषयी मंथन सुरू आहे. मतदार नोंदणीचे असलेले क्लिष्ट नियम हे एक कारण असल्याचे सांगितले जाते; परंतु, सर्वसाधारण निवडणुकीतही मतदार यादीत नाव असावे, याविषयी नागरिकांचा निरुत्साह सर्वज्ञात आहे. विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना या निवडणुकीचा दीर्घ अनुभव आहे, कॉंग्रेस पक्षासोबतच त्यांची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. त्यामुळे त्यांची सभासद नोंदणी व्यवस्थित होत आहे. नव्याने रिंगणात उतरणाऱ्या उमेदवार आणि पक्षांपुढे मात्र मतदार नोंदणीचे आव्हान राहणार आहे. भाजपकडून नामकोचे हेमंत धात्रक इच्छुक आहेत. मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे हे पुन्हा एकदा नशीब आजमावण्याच्या तयारीत आहेत. त्यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा अपेक्षित आहेत. शिक्षणसंस्थाचालक हा या निवडणुकीतला प्रमुख घटक आहे. त्यांच्याकडे शिक्षकांची हक्काची मते आहेत. तिघेही शिक्षण संस्थेशी संबंधित आहेत.