टक्का वाढला : नाशिक, दिंडोरीत अंदाजे ६२ टक्के मतदान; सायंकाळी उशीरापर्यंत रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 09:22 PM2019-04-29T21:22:12+5:302019-04-29T21:26:11+5:30

नाशिक लोकसभा मतदार संघात १६ बॅलेट युनिट व १४ कंट्रोल युनिट त्याच बरोबर १८ व्हिव्हीपॅट बंद पडल्याचे निदर्शनास आले. तर दिंडोरी मतदार संघात ७ बॅलेट युनिट, १६ कंट्रोल युनिट व १६ व्हिव्हीपॅट यंत्र बंद पडली.

Percent increase in Nashik, Dindori polls; Range till late evening | टक्का वाढला : नाशिक, दिंडोरीत अंदाजे ६२ टक्के मतदान; सायंकाळी उशीरापर्यंत रांगा

टक्का वाढला : नाशिक, दिंडोरीत अंदाजे ६२ टक्के मतदान; सायंकाळी उशीरापर्यंत रांगा

Next
ठळक मुद्देदोन तासात नाशिक मतदार संघात अवघ्या ६.६९ टक्के दुपारी मतदानाचा वेग काहीसा थंडावला.

नाशिक : जिल्ह्यातील दिंडोरी व नाशिक मतदार संघात सोमवारी अंदाजे ६२ टक्के मतदारांनी उत्स्फूर्तपणे आपला हक्क बजावला. त्यात नाशिक मतदार संघात अंदाजे ५४.५० टक्के तर दिंडोरी मतदार संघात ६३.५० टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले. तथापि, सायंकाळी उशिरापर्यंत अनेक मतदान केंंद्रावर मतदारांच्या रांगा असल्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत आणखी वाढ होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदानाचा टक्का वाढल्यामुळे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही या वाढलेल्या टक्क्याचा धसका घेतला असून, प्रत्येक जण आपापल्यापरिने या वाढलेल्या टक्क्याचा अर्थ काढत आहे.
दरम्यान, या निवडणुकीतही मतदानासाठी गेलेल्या मतदारांची नावे यादीतून गहाळ झाल्याच्या तर काहींना नावेच न सापडल्याच्या असंख्य तक्रारी करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी मतदान यंत्रे अचानक बंद पडल्यामुळे मतदान केंद्रावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र काही वेळातच ८७ यंत्रे बदलण्याची तत्परता यंत्रणेने दाखविल्यामुळे मतदानासाठी वेळ वाढवून देण्यात आली. ग्रामीण भागात सकाळी मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली तर शहरी भागात सकाळी व दुपारनंतर मतदार बाहेर पडले. मतदानाची वेळ सायंकाळी सहा वाजेची असतांनाही साडेपाच वाजेनंतर अनेक मतदारांनी मतदान केंद्रावर धाव घेतल्यामुळे शहर व ग्रामीण भागातील काही मतदान केंद्रावर सहा वाजेनंतरही मतदान सुरू होते.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात नाशिक व दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदार संघाच्या अनुक्रमे १९०७ व १८८४ मतदान केंद्रावर सकाळी सात वाजता मतदानाला सुरूवात करण्यात आली. मतदानाला सुरूवात करण्यापुर्वी प्रत्येक केंद्रावर उमेदवारांच्या प्रतिनिधींसमक्ष मॉकपोल (मतदानाचे प्रत्यक्ष प्रात्याक्षिक) घेण्यात आले. त्यात नाशिक लोकसभा मतदार संघात १६ बॅलेट युनिट व १४ कंट्रोल युनिट त्याच बरोबर १८ व्हिव्हीपॅट बंद पडल्याचे निदर्शनास आले. तर दिंडोरी मतदार संघात ७ बॅलेट युनिट, १६ कंट्रोल युनिट व १६ व्हिव्हीपॅट यंत्र बंद पडली. यंत्रे बंद पडल्याचे पाहून काही केंद्रावरील अधिकाºयांना घाम फुटला तर काहींनी तात्काळ सेक्टर अधिकाºयाशी संपर्क साधून यंत्रे बंद पडल्याची माहिती दिली. अवघ्या काही वेळातच बंद पडलेली यंत्रे बदलण्यात आली. त्यामुळे या ठिकाणी सकाळी सातच्या ठोक्याला मतदान सुरू होऊ शकले नाही. मात्र यंत्राच्या या गोंधळामुळे सकाळी सर्व प्रथम मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेल्या मतदारांना काही वेळ ताटकळावे लागले. अन्यत्र मतदान केंद्रावर मात्र मतदारांनी उत्स्फुर्तपणे आपला हक्क बजावण्यास सुरूवात केली. सकाळी सात ते नऊ या दोन तासात नाशिक मतदार संघात अवघ्या ६.६९ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला तर दिंडोरी मतदार संघात ७.२८ टक्के मतदारांनी मतदान केले. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मतदारांची उत्स्फुर्तता अधिक दिसून आली. अनेक मतदार केंद्रावर मतदारांनी रांगा लावल्या होत्या. त्यात वृद्धांसह पहिल्यांदाच मतदार करणा-या नव मतदारांचाही समावेश दिसून आला. तर शहरी भागात संमिश्र प्रतिसाद दिसून आला. सकाळी नऊ वाजेनंतर मात्र मतदानाचा जोर काहीसा वाढला. अनेक नागरिकांनी सर्व तयारी करूनच मतदान केंद्र गाठले. सकाळी अकरा वाजेपर्यंत दिंडोरी मतदार संघात २१.०६ टक्के तर नाशिक मतदार संघात १७.२२ टक्के इतके मतदान नोंदविले गेले. मतदानाची वाढती टक्केवारी दुपारी एक वाजेपर्यंत कायम राहिली. दिंडोरी मतदार संघात दुपारी एक वाजता ३५.५० टक्के तर नाशिक मतदार संघात ३०.५० टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. त्यानंतर दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत मतदानाचा वेग काहीसा उन्हामुळे थंडावला. त्यानंतर पुन्हा चार वाजेनंतर मतदार बाहेर पडले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत दिंडोरी मतदार संघात ५८ टक्के तर नाशिक मतदार संघात ५३.५० टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. तर सायंकाळी सहा वाजता मतदानाची वेळ संपल्यावरही मतदारांच्या रांगा कायम असल्याने प्रशासनाने अंदाजे टक्केवारी काढली असता त्यात दिंडोरीत ६३.५० टक्के तर नाशिक मतदार संघात ५४.५० टक्के मतदान झाल्याचे सांगितले. मात्र अंतीम आकडेवारी मतदान यंत्रे स्ट्रॉँगरूम मध्ये पोहोचल्यानंतरच स्पष्ट होणार असून, त्यात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Percent increase in Nashik, Dindori polls; Range till late evening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.