यंदा वाढणार मतांचा टक्का?
By धनंजय वाखारे | Published: March 22, 2019 01:40 AM2019-03-22T01:40:51+5:302019-03-22T01:42:50+5:30
गेल्या काही वर्षांत घटत चाललेली मतदानाची टक्केवारी चिंतेचा विषय बनली आहे. त्यापार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगासह विविध संस्था-संघटनांमार्फत मतदार जागृती केली जात आहे.
नाशिक : गेल्या काही वर्षांत घटत चाललेली मतदानाची टक्केवारी चिंतेचा विषय बनली आहे. त्यापार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगासह विविध संस्था-संघटनांमार्फत मतदार जागृती केली जात आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात गेल्या १६ सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सर्वाधिक मतदानाची टक्केवारी १९६७ साली नोंदविली गेली आहे. विशेष म्हणजे त्यावेळी झालेली दुरंगी लढत एकमेव ठरली आहे. त्यावेळी, भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेसचे बी.आर. कवडे यांनी रिपाइंचे दादासाहेब गायकवाड यांचा पराभव केला होता. मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे ४३.१३ टक्के मतदान २००४च्या निवडणुकीत झालेले आहे.
आता होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक मतदारसंघात १८ लाख ५३ हजार मतदार असून, तरुण मतदारांची संख्या लक्षणीय असल्याने मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या १६ लोकसभा निवडणुकांमध्ये नाशिक मतदारसंघात एकदाही मतदानाची टक्केवारी ७० टक्क्यांपलीकडे गेलेली नाही. नाशिक मतदारसंघात १९५१ मध्ये झालेल्या निवडणुकीत ३ लाख ८५ हजार ८६८ मतदार होते. त्यापैकी दोन लाख पाच हजार १७५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यावेळी मतांची टक्केवारी ५३.१७ टक्के इतकी राहिली होती. विशेष म्हणजे पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावूनही सर्वच्या सर्व मतदान वैध ठरले होते. त्यानंतर १९५७ मध्ये झालेल्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी घसरून ते ४८.१३ टक्के इतके नोंदविले गेले. त्यावेळीही सर्वच्या सर्व मते वैध ठरली होती. १९६२ मध्ये ५४.१८ टक्के मतदान नोंदविले गेले तर १९६७ मध्ये झालेल्या दुरंगी सामन्यात सर्वाधिक ६५.७९ टक्के मतदानाची टक्केवारी नोंदविली गेली. तो आजतागायत विक्रम अबाधित आहे. त्यानंतर, १९७१ ते २००९ पर्यंत एकदाही मतांची टक्केवारी ६० टक्क्यांच्या पुढे सरकली नाही.
सर्वात कमी मतदानाची टक्केवारी २००४ मध्ये ४३.१३ टक्के इतकी नोंदविली गेली. त्यावेळी रिंगणात नऊ उमेदवार होते. २००४ मध्ये १५ लाख २२ हजार ६६२ मतदार होते. त्यातील सहा लाख ५६ हजार ७४५ मतदारांनीच मतदान केले. म्हणजे निम्म्याहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्का बजावला नाही. पुढे २००९ मध्ये १४ लाख ४८ हजार ४१४ मतदार होते. त्यापैकी सहा लाख ५७ हजार ८८९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतदानाची टक्केवारी ४५.४२ टक्के राहिली.
मालेगाव मतदारसंघात १९६२ मध्ये सर्वाधिक नोंद
जिल्ह्यातील पूर्वाश्रमीच्या मालेगाव लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदानाची टक्केवारी १९६२ मध्ये झालेल्या निवडणुकीत नोंदविली गेलेली आहे. त्यावेळी तिरंगी लढत होऊन चार लाख ६२ हजार ३०५ मतदारांपैकी तीन लाख आठ हजार ६३४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यात दोन लाख ७१ हजार १३२ मते वैध ठरली होती. त्यानंतर मालेगाव मतदारसंघात सर्वात कमी मतदानाची नोंद १९९६च्या निवडणुकीत नोंदविली गेली. त्यावेळी रिंगणात ९ उमेदवार होते. १० लाख ५६ हजार ७१७ मतदारांपैकी चार लाख ४० हजार ८८२ मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला होता. मतदानाची सर्वात टक्केवारी ४१.७२ टक्के इतकी नीचांकी राहिली. २०१४ च्या निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीचा आलेख उंचावला गेला. दिंडोरी ह्या नव्या रचनेत बनलेल्या मतदारसंघात ६३.४१ टक्के मतदान नोंदविले गेले.