साक्षीच्या कामगिरीने महिलांच्या कुस्ती आखाड्याला ‘वलय
By admin | Published: August 19, 2016 12:57 AM2016-08-19T00:57:45+5:302016-08-19T00:59:10+5:30
’कुस्ती क्षेत्राला बळ : नाशिकच्या कुस्तीपटूंच्याही उंचावल्या अपेक्षा
नाशिक : साक्षी मलिकने आॅलिम्पिक स्पर्धेत मिळवलेल्या कांस्य पदकामुळे कुस्तीपटूंमध्ये नवी उमेद निर्माण झाली आहे. साक्षीच्या कामगिरीमुळे महिला कुस्ती प्रकाराकडे लक्ष वेधले गेले आहे. यामुळे महिलांच्या कुस्तीला बळ मिळेल, अशी अपेक्षा या क्षेत्रातील मान्यवरांना वाटते आहे.
या क्षेत्रात सकारात्मक बदल झाल्यास महिला कुस्ती प्रकारातही पैलवानांची संख्या निश्चितच वाढू शकते. नाशिक जिल्ह्यातून नऊ महिला कुस्तीपटूंनी राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व केले असून नाशिकमध्येही महिला कुस्तीपटूंचे मनोधैर्य उंचावले आहे. यातून आणखी महिला कुस्तीपटू तयार होतील, अशी अपेक्षा क्रीडा तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
आॅलिम्पिक स्पर्धेत भारताची कुस्तीपटू साक्षी मलिक हिने ५८ किलो वजनी गटाच्या फ्रीस्टाईल कुस्तीत कांस्य पदक पटकावले आहे. यासंदर्भात नाशिकच्या कुस्तीपटूंनी आपली मते मांडली. (प्रतिनिधी)