मतदानानंतर सुरू आकडेमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2019 12:50 AM2019-05-01T00:50:17+5:302019-05-01T00:50:41+5:30

गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी अखेर मतदान पार पडले असून, मतदानाचा टक्का अल्पसा वाढला आहे. तथापि, शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मतदान वाढले आहे. हा टक्का कोणाला फायदेशीर ठरणार, याविषयी राजकीय पक्ष आणि उमेदवार आडाखे मांडत आहेत.

 Performing calculations after polling | मतदानानंतर सुरू आकडेमोड

मतदानानंतर सुरू आकडेमोड

Next

नाशिक : गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी अखेर मतदान पार पडले असून, मतदानाचा टक्का अल्पसा वाढला आहे. तथापि, शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मतदान वाढले आहे. हा टक्का कोणाला फायदेशीर ठरणार, याविषयी राजकीय पक्ष आणि उमेदवार आडाखे मांडत आहेत.
नाशिक लोकसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत म्हणजेच ५८.८२ टक्के मतदान झाले होते. यंदा ५९.४३ टक्के मतदान झाले आहे. म्हणजेच ०.६१ टक्के इतके मतदान झाले आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्य हे मतदार संघ पूर्णत: शहरी आहेत.
देवळाली मतदारसंघात मात्र संमिश्र भाग आहे, तर अन्य दोन मतदारसंघांत सिन्नर आणि इगतपुरी-त्र्यंबक हे पूर्णत: ग्रामीण भागात मोडतात. नाशिक शहरातील देवळालीसह चार मतदारसंघांचा विचार केला तर दहा लाख मतदार असून शहरी भागातील मतदारच निर्णायक ठरेल, असे मानले जात होते. परंतु सोमवारी (दि. २९) झालेल्या मतदानात ग्रामीण भागाचा समावेश ठरलेल्या मतदारसंघात अधिक मतदान झाले आहे.
यात नाशिक पूर्व, पश्चिम आणि मध्य या तिन्ही मतदारसंघांत सर्वसाधारणपणे ५५ टक्के मतदान झाले आहे. परंतु त्याव्यतिरिक्त देवळाली, इगतपुरी आणि सिन्नर या मतदारसंघात ६० ते ६८ टक्क्यांच्या दरम्यान मतदान झाले आहे. त्यामुळे ते कोणाच्या पथ्यावर पडणार हे महत्त्वाचे आहे. विशेषत: सिन्नर तालुक्यात ६४.९७ टक्के मतदान झाले आहे, तर देवळालीतही ६०.७३ टक्के आणि इगतपुरीमध्ये ६७.६० टक्के इतके मतदान झाले आहे. म्हणजेच ग्रामीण भागातही मतदान जास्त झाले आहे.
जाणकारांच्या म्हणण्यानुसार शहरी भागातील मतदार हा युतीकडे झुकलेला असतो तर ग्रामीण भागातील मतदार हा आघाडीकडे किंवा पारंपरिक पक्षांकडे असतो. यामुळे कोणाला संधी मिळेल याचे गणित मांडले जात आहे. काही उमेदवारांच्या मते जास्त झालेले मतदान हा एका अभिनिवेशातून झाले आहे.
ग्रामीण-शहरी भागात मतांचा फरक
नाशिक लोकसभा मतदारसंघातील शंभर टक्के शहरी भागातील नाशिक पूर्व, पश्चिम आणि मध्य यांचा हिशेब बघितला तर ५ लाख ८८ हजार १ इतके मतदान झाले आहे. देवळाली, इगतपुरी-त्र्यंबक आणि सिन्नर या तीन मतदारसंघांत ५ लाख ३० हजार ५७५ इतके मतदान झाले आहे. म्हणजे दोघांमधील फरक तपासला तर ५७ हजार ४२६ मतांचा फरक असून त्यामुळेच ही निवडणूक अधिक अटी-तटीची असून, अंदाज बांधणे कठीण होत असल्याचेदेखील सांगितले जात आहे.
मतदान नेहमी उत्स्फूर्तपणे होते आणि टक्केवारी वाढते तेव्हा हा कौल परिवर्तनवादी असल्याचे म्हणजे सत्ताधिकाऱ्यांच्या विरोधात असल्याचे मानले जाते आणि मतदान जेमतेम होते तेव्हा मतदारांचा कल फारसा बदलाकडे नाही, असे ही मानले जाते. नाशिक लोकसभेसाठी २०१४ मध्ये ५८.८२ टक्के मतदान झाले होते. तर यंदा ५९.४३ टक्के इतके झाले आहे. म्हणजेच ०.६१ टक्के इतकी वाढ झाली आहे म्हणजे वाढ आहे, परंतु अल्प वाढ असल्याने त्यादृष्टीनेदेखील अनेकांना अंदाज बांधणे कठीण झाले आहे.
केंद्र सरकार हे मजबूतच रहावे यादृष्टीने मतदान झाले आहे. शहरी भागात नेहमी फारसा बाहेर न पडणारा मतदार बाहेर पडल्याने उत्स्फूर्तता युतीच्या पथ्यावर आहे. ग्रामीण भागातील मतदानात वाढ होत असताना सिन्नरमध्ये स्थानिक उमेदवाराने निवडणूक लढवण्यामुळे मतदान जास्त झाले आहे. परंतु एकूणच मतदानाचा टक्का वाढणे हे युतीच्या पथ्यावर आहे. त्यामुळे एकंदरीतच युतीचा फायदाच झाला़
- हेमंत गोडसे, उमेदवार, शिवसेना
या निवडणुकीत ग्रामीण भागात जे उत्साही मतदान झाले त्यामागे दु:खी पीडित शेतकऱ्यांची व्यथा हे कारण होते. शेतकरी उत्साहाने बाहेर पडले. त्यानंतर शहरी भागात गेल्यावेळी जे वातावरण होते त्यात बदल होता. पंतप्रधानांची फसवेगिरी पूर्णत: मतदारांच्या लक्षात आल्याने त्याचा अनुकूल लाभ झाला. यंदा मोदी लाट नव्हती. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे त्रास सहन करावा लागला ते सर्वच उत्स्फूर्तपणे बाहेर पडलेले नाहीत.
- समीर भुजबळ, उमेदवार, राष्टÑवादी
मतदारांनी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस महाआघाडी आणि शिवसेना, भाजपा युतीच्या विरोधातील रोष व्यक्त केल्याने या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढल्याचे दिसून आले. युती आणि आघाडीच्या उमेदवारांविषयी मतदारांमध्ये असंतोष होता. अशा परिस्थितीत माझ्या अपक्ष उमेदवारीच्या माध्यमातून मतदारांना सक्षम पर्याय मिळाल्यामुळे उत्स्फूर्त मतदान झाले. सक्षम उमेदवार निवडून आणण्यासाठी मतदान केले.
- माणिकराव कोकाटे, उमेदवार, अपक्ष

Web Title:  Performing calculations after polling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.