कायमस्वरूपी सीसीटीव्हीसाठी सल्लागार समिती
By admin | Published: July 21, 2016 02:03 AM2016-07-21T02:03:23+5:302016-07-21T02:06:31+5:30
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर कारवाई : गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना
नाशिक : शहरात गुन्हेगारी वाढल्याने कायमस्वरूपी सीसीटीव्ही बसविण्यात यावे, या मागणीस मुख्यमंत्र्यांनीही मान्यता दिल्यानंतर राज्य सरकारच्या आदेशानुसार सीसीटीव्हीसाठी एका सल्लागार समितीची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त एस़ जगन्नाथन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली़
पोलीस आयुक्तांनी सांगितले की, शहरातील कायमस्वरूपी सीसीटीव्ही बसविण्यासाठी राज्य सरकारच्या आदेशानुसार सल्लागार समितीची नियुक्ती करण्यात आली असून, ही समिती आपला अहवाल तयार करणार आहे़ या अहवालानुसार राज्यसरकारने खर्चास मान्यता दिल्यानंतर त्याची निविदा व त्यानंतर प्रत्यक्ष कामाकाजास सुरुवात केली जाणार आहे़ हा सर्व कालावधी लक्षात घेता किमान दोन वर्ष यासाठी लागण्याची शक्यता आहे़ सिंहस्थात होणारी भाविकांची लक्षावधींची गर्दी पाहता सीसीटीव्ही बसविण्यात आले होते़ मात्र पर्वण्या संपताच १५ आॅक्टोबर २०१५ रोजी सीसीटीव्ही काढून घेण्यात आले. त्यानंतर शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे कायमस्वरूपी सीसीटीव्ही असावेत, अशी मागणी नाशिककरांसह लोकप्रतिनिधींनी उचलून धरली होती़ त्यानुसार एक समिती नियुक्ती करण्यात आली होती. पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाणेनिहाय सर्वेक्षण करून सुमारे ७५० सीसीटीव्ही बसवण्याची सूचना समितीने केली होती़ मात्र यातील काही त्रुटींबाबत आक्षेप घेऊन राज्य सरकारने हा प्रस्ताव पुन्हा शहर पोलिसांकडे पाठविला होता़ या प्रस्तावात सुधारणा करून हा प्रस्ताव पुन्हा सरकारकडे पाठविल्यानंतर त्यास मंजुरी देण्यात आली आहे़ त्यानुसार शहरातील सीसीटीव्ही बसविण्याच्या कामासाठी इच्छुक असलेल्या पाच कंपन्यांपैकी एका कंपनीची सल्लागार समिती म्हणून निवड करण्यात आली आहे़ संबंधित कंपन्यांच्या अहवालानंतर यासाठी लागणारा खर्च राज्यसरकारला सादर केला जाईल़ त्यानंतर राज्यसरकार या कामाचे निविदप्रक्रिया राबवेल व कामास सुरुवात होईल़ नाशिक शहराचा वाढता विस्तार व गुन्हेगारी पाहता सीसीटीव्हीमुळे पोलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यास मोठी मदत मिळणार आहे़