स्थायीवर प्रस्ताव : घरगुती दरात प्रति हजारी एक रुपया वाढीची शिफारस
By admin | Published: February 24, 2016 11:50 PM2016-02-24T23:50:09+5:302016-02-24T23:53:35+5:30
टेलिस्कोपिक दराने पाणीपट्टी आकारणी
नाशिक : ‘जादा पाणीवापर जादा आकारणी आणि कमी पाणीवापर कमी आकारणी’ हे टेलिस्कोपिक दर आकारणीचे सूत्र वीज वितरण कंपनीप्रमाणेच महापालिकेनेही पाणीपट्टीबाबत लागू करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीवर ठेवला आहे. याशिवाय, पाणीपुरवठ्यावर होणारा वाढता खर्च लक्षात घेता मीटरद्वारे होणाऱ्या पाणीपुुरवठ्यात सन २०१८-१९ या वर्षापर्यंत प्रतिवर्षी प्रति हजारी लिटर्समागे घरगुती पाणीवापरासाठी एक रुपया वाढ करण्याचेही प्रशासनाने प्रस्तावित केले आहे.
महापालिकेने सन २००७ मध्ये तीन वर्षांसाठी पाणीपट्टीत वाढ केली होती. त्यानंतर आजपर्यंत पाणीपुरवठ्याच्या दरात वाढ झालेली नाही. पाटबंधारे विभागाकडून पिण्याच्या पाण्याच्या दरात झालेली सुमारे ४० टक्के वाढ, महावितरण कंपनीच्या वीज दरात झालेली १४० टक्क्यांनी वाढ, पाणी शुद्धीकरणासाठी लागणाऱ्या साधनसामग्री दरातही झालेली वाढ आणि आस्थापना खर्चात १०० टक्क्यांपर्यंत झालेली वाढ लक्षात घेता प्रशासनाने पाणीपुरवठा दरात वाढ प्रस्तावित केली आहे.