अटी-शर्तींवरच बांधकामांना परवानगी
By admin | Published: February 2, 2016 11:53 PM2016-02-02T23:53:38+5:302016-02-02T23:54:40+5:30
महापालिका : नगररचना विभागाला आदेश
नाशिक : सदनिका खरेदी करणाऱ्या ग्राहकांची फसवणूक होऊ नये आणि ग्राहकांमध्येही जागृती व्हावी या उद्देशाने महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी यापुढे इमारतींच्या बांधकामांना काही अटी-शर्तींवरच परवानगी देण्याचे आदेश नगररचना विभागाला दिले असून अटी-शर्तींशिवाय परवानग्या दिल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित कनिष्ठ अभियंत्यास जबाबदार धरले जाणार आहे.
महापालिकेच्या मंजूर विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदीनुसार इमारत बांधकाम परवानगी व भोगवटा दाखल्याबाबतच्या प्रस्तावांना व त्यासोबतच्या बांधकाम नकाशांना महापालिकेच्या नगररचना विभागामार्फत मंजुरी देण्यात येते. परंतु सदर बांधकाम परवानगी देताना मंजूर नकाशावर तसेच प्रारंभ प्रमाणपत्रात बांधकाम क्षेत्र, सदनिकानिहाय चटई क्षेत्र, खोल्यांची अंतर्गत मोजमापे व क्षेत्रफळ या बाबींचा समावेश नसल्याने सर्वसामान्य नागरिक सदनिकांची खरेदी करताना संभ्रमावस्थेत असतात. याशिवाय, तांत्रिक ज्ञानाच्या अभावामुळे विकास नियंत्रण नियमावलीनुसार अनुज्ञेय असलेला वाणिज्य वापर याबाबत बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र अथवा नकाशावर नमूद केलेले नसल्याने सदनिका खरेदी करणाऱ्यांची फसवणूक होण्याचे प्रकार असल्याचे नगररचना विभागाच्या निदर्शनास आले. त्यामुळे आयुक्तांनी काही अटी-शर्तींवरच बांधकाम परवानगीचे प्रस्ताव मंजूर करण्याचे आदेश नगररचना विभागाला काढले आहेत. प्रामुख्याने, इमारत बांधकाम प्रस्ताव सदनिकांसाठी असल्यास त्यात सदनिकेनिहाय बांधकाम क्षेत्र (चटई क्षेत्र निर्देशांक विरहित क्षेत्र उदा. बाल्कनी, जिना, खुली गच्ची, कपाट, आर्किटेक्चरल प्रोजेक्शन आदि वगळून) तक्ता, सदनिकानिहाय चटई क्षेत्र तक्ता, खोल्यांची अंतर्गत मोजमापे व क्षेत्रफळ तक्ता आणि सदर बांधकामाचा विकास नियंत्रण नियमावलीनुसार रुग्णालय इमारत, सभागृह इमारत व शैक्षणिक इमारत आदि विशिष्ट वापर अनुज्ञेय आहेत किंवा नाही याचा स्पष्ट उल्लेख असणे बंधनकारक करण्यात आले आहे.