आदेश डावलून खडीक्रशरला परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 01:41 AM2019-02-12T01:41:00+5:302019-02-12T01:42:55+5:30
दफ्तर तपासणीस देण्यास विलंब करणाऱ्या तळेगाव येथील ग्रामसेवकाला कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आल्यानंतर संबंधित ग्रामसेवकाच्या अडचणीत अधिकच वाढ होण्याची शक्यता आहे. दिंडोरी गटविकास अधिकाºयांनी दिलेल्या अहवालात संबंधित ग्रामसेवकाने जिल्हाधिकाºयांचे आदेश डावलून खडीक्रशर चालविण्यास परवानगी दिल्याचे चौकशीत समोर आल्याने ग्रामसेवक संदीपान नेटके यांची अडचण अधिक वाढणार आहे.
नाशिक : दफ्तर तपासणीस देण्यास विलंब करणाऱ्या तळेगाव येथील ग्रामसेवकाला कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आल्यानंतर संबंधित ग्रामसेवकाच्या अडचणीत अधिकच वाढ होण्याची शक्यता आहे. दिंडोरी गटविकास अधिकाºयांनी दिलेल्या अहवालात संबंधित ग्रामसेवकाने जिल्हाधिकाºयांचे आदेश डावलून खडीक्रशर चालविण्यास परवानगी दिल्याचे चौकशीत समोर आल्याने ग्रामसेवक संदीपान नेटके यांची अडचण अधिक वाढणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी गेल्या नोव्हेंबरमध्ये दिंडोरी तालुक्यातील तळेगाव येथे अचानक भेट देऊन तपासणी केली असता त्यांना अनेक त्रुटी आढळल्या होत्या. यावेळी त्यांनी ग्रामपंचायत दप्तराची तपासणीसाठी मागणी केली असता ग्रामसेवक संदीपान नेटके यांनी प्रकृती ठीक नसल्याचे कारण देत दोन दिवसांत दप्तर सादर करण्याचे आश्वास देत तशी विनंती मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांच्याकडे केली होती. मात्र मुदतीनंतरही ग्रामसेवकाने दप्तर उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ चालविली होती. अनेकविध कारणे पुढे करीत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र गिते यांनी ग्रामसेवकावर थेट कारवाई करीत ग्रामसेवक संदीपान नेटके यांना कर्तव्यात कसूर करणे, वरिष्ठ अधिकाºयांच्या सूचनांचे पालन न करणे या कारणांमुळे जिल्हा परिषदेच्या सेवेतून जानेवारीत निलंबित केले होते.
याप्रकरणी संबंधित ग्रामसेवकाच्या कामकाजाची गटविकास अधिकाºयामार्फत चौकशीदेखील सुरू होती. सोमवारी दिंडोरीचे गटविकास अधिकारी भूपेंद्र बेडसे यांनी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांच्याकडे त्यासंदर्भाचा अहवाल सादर केला. त्या अहवालानुसार जिल्हाधिकाºयांनी खडीक्रेशरला बंदी आदेश दिलेले असतानाही संबंधित ग्रामसेवकाने खडी काढण्यास परवानगी दिल्याचे अहवालात नमूद केले आहे. त्यामुळे ग्रामसेवकाच्या अडचणीत अधिकच वाढ होणार आहे.
—इन्फो—
निलंबन रद्दसाठी दबावतंत्र
मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांनी ग्रामसेवक संदीपान नेटके यांना निलंबित केल्यानंतर संबंधित ग्रामसेवकाने निलंबन रद्दसाठी दबावतंत्राचा वापर केल्याची चर्चादेखील होऊ लागली आहे. एकीकडे त्याच गावात परतण्यासाठीचे प्रयत्न सुरू असताना चौकशी अहवालात थेट जिल्हाधिकाºयांच्या कार्यक्षेत्रातील हस्तक्षेप समोर आल्याने नेटके यांच्यावरील कारवाईकडे पुन्हा एकदा लक्ष लागले आहे.