एचएएल हद्दीतून सुकेणेकडील शहर बससेवेला परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 09:51 PM2020-12-22T21:51:02+5:302020-12-23T00:53:46+5:30
कसबे सुकेणे : बाणगंगा काठच्या कसबे सुकेणेसह दहा गावांचा रस्ता बंद करून कोंडी करणाऱ्या एचएएल प्रशासनाने कसबे सुकेणे मार्गे ये-जा करणाऱ्या साध्या व शहर बस वाहतुकीला परवानगी दिली आहे. दरम्यान, शालेय बसेस, रुग्णवाहिका, शेतमालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांसह अन्य प्रवासी वाहतुकीला मात्र परवानगी नाकारली आहे.

कसबे सुकेणे व बाणगंगाकाठच्या गावांचा एचएएल हद्दीतून रस्ता ओझर येथे मुंबई-आग्रा महामार्गाला मिळतो, परंतु कोरोनाचे कारण देत एचएएलने या रस्त्याची नाकाबंदी करून सुमारे दहा गावांची कोंडी केली होती. याबाबत आमदार दिलीप बनकर व कसबे सुकेणे ग्रामपालिकेने रस्ता खुला करावा, अशी मागणी केली होती. खासदार डॉ. भारती पवार, बनकर यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर एचएएलने कसबे सुकेणेकडे जाणाऱ्या व कसबे सुकेणेकडून येणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या साध्या व शहर बसेसला त्यांच्या हद्दीतून ये-जा करण्यासाठी परवानगी दिल्याचे पत्र कसबे सुकेणे ग्रामपालिकेला प्राप्त झाले आहे. पत्रात केवळ शहर बस वाहतुकीचा उल्लेख असून, कृषिमाल व इतर प्रवासी वाहतुकीला परवानगी न दिल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. शालेय बस, खासगी प्रवासी वाहने व शेतमाल आणि रुग्णवाहिका या वाहतुकीला परवानगी द्यावी, अशी मागणी परिसरातील जनतेने केली आहे.
एचएएलने ग्रामपालिकेला पाठविलेल्या पत्रात केवळ शहर बस वाहतुकीला परवानगी दिली आहे; परंतु शेतमाल, इतर प्रवासी वाहने, रुग्णवाहिका व शालेय विद्यार्थी वाहतुकीची कोंडी कायम आहे. आम्ही याबाबत पुन्हा आमदारांना निवेदन दिले असून, जुना रस्ता खुला करून देण्याची मागणी केली आहे.
- धनंजय भंडारे, उपसरपंच कसबे सुकेणे