परमिट रूम, बिअर बार चालक आर्थिक अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 12:31 AM2020-09-15T00:31:00+5:302020-09-16T01:05:53+5:30
नाशिक : मार्च महिन्यात राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या तगाद्यामुळे परमिट व बिअर बार मालकांकडून वर्षभराचे परवाना शुल्क भरून घेतले, त्यानंतर मात्र अवघ्या काही दिवसातच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने शासनाने लॉकडाऊन जाहीर करून परमीट रूम व बिअर बार बंद करून टाकले. गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेले बिअर बार व परमिट रूमचे परवाना शुल्क भरूनही व्यवसाय करता येत नाही, दुसरीकडे वाईन शॉपमधून मद्यविक्री सुरू झाल्यामुळे परमिट रूम, बिअर बारचे महत्त्वही कमी झाले आहे. अशा परिस्थितीत वर्षभराचे शुल्क भरूनही परवानाधारक चालक-मालक आर्थिक अडचणीत सापडलेले असताना शासनाने त्यांच्या व्यवसायाला अद्यापही अनुमती दिलेली नाही.
अनलॉक की लॉकडाऊन?
लोकमत न्यूज नेटवर्क

देशपातळीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन घोषित केला. अत्यावश्यक सेवा या लॉकडाऊनमधून वगळण्यात येऊन नागरिकांची गर्दी होणारे व्यवसाय पूर्णत: बंद केले. यात वाइन शॉप, परमिट रूम, बिअर बारचादेखील समावेश होता. तत्पूर्वी मार्च महिन्यातच पुढील आर्थिक वर्षासाठी या व्यावसायिकांना आपल्या व्यवसायाचा परवाना नूतनीकरण करणे आवश्यक असल्याने जवळपास सर्वच परमिट रूम, बिअर बार चालक-मालकांनी आपले परवाने नूतनीकरण केले. शासनाने २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी परवाना शुल्कात वाढ केल्यामुळे एका परवानाधारकाला सहा लाख ९५ हजार रुपये तर त्यापेक्षा अधिक परवानाधारकांनी त्याप्रमाणात शुल्काची रक्कम भरली. मात्र रक्कम भरल्यानंतर अवघ्या काही दिवसातच कोरोनामुळे व्यवसाय बंद करावा लागला. या परमिट रूम, बिअर बार चालकांकडे पडून असलेला मद्यसाठा अनेक महिने लॉकडाऊनमुळे विक्री करता आला नाही. परिणामी भांडवल गुंतून पडले व व्यवसायही बंद पडल्याने परवानाधारक सैरभैर झाले. सात महिन्यांपासून बंद असलेले व्यवसाय नजीकच्या काळात सुरू होतील की नाही, याविषयी अद्यापही साशंकता व्यक्त केली जात आहे. या परमिट रूम, बिअर बारमध्ये कामाला असलेले कारागीर बेरोजगार तर झालेच, परंतु जागेचे भाडे थकले, वीजबिल, पाणीपट्टी, घरपट्टी भरणेही मुश्कील झाले आहे. परमिट रूम, बिअर बार बंद असले तरी, शासनाने वाइन शॉप सुरू केले, त्याचबरोबर ढाबे, हॉटेलही सुरू ठेवण्याचे आदेश दिल्यामुळे मद्यपींची सोय झाली आहे. अनेक ठिकाणी अनधिकृत मद्यविक्री केली जात असून, परमिट रूम, बिअर बारची गरजही संपुष्टात आल्याचे चित्र आहे. मात्र गेल्या सात महिन्यांपासून शासनाचा परवाना शुल्क भरूनही व्यवसाय करण्याची अनुमती नसल्याने परवानाधारक हवालदिल झाले आहेत. शासनाकडून परवानापोटी भरलेले शुल्क परत दिले जाईल की, पुढच्या वर्षासाठी रक्कम वळती केली जाईल याचा कोणताही उलगडा झालेला नाही. व्यवसाय सुरू करण्यासाठी हाती भांडवलही शिल्लक नसल्याने परमिट रूम, बिअर बार चालक-मालक पूर्णत: उद्ध्वस्त झाले आहेत.