वैयक्तिक थकहमीवर नासाका होणार सुरू
By admin | Published: July 13, 2017 11:33 PM2017-07-13T23:33:02+5:302017-07-13T23:50:13+5:30
सहकारमंत्र्यांची ग्वाही : सरकार ठेवणार देखरेख
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : नाशिक सहकारी साखर कारखाना शंभर टक्के एनपीएत असल्याने त्यासाठी सरकार पातळीवरून थकहमी देणे अशक्य आहे. मात्र नासाकावर नेमलेल्या प्राधिकृत मंडळाच्या संचालकांनी वैयक्तिक थकहमी दिल्यास राज्य शिखर बॅँक टप्प्या टप्प्याने चालू गळीत हंगामासाठी नासाकाला कर्ज उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
गुरुवारी (दि.१३) मुंबईला सुभाष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत नासाका सुरू करण्याबाबत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार बाळासाहेब सानप, नासाका प्राधिकृत मंडळाचे अध्यक्ष तानाजी गायधनी, सदस्य प्रकाश घुगे, नंदू हांडे, अरुण जेजूरकर, राज्य शिखर बॅँकेचे प्राधिकृत संचालक मंडळ, सहकार विभागाचे अप्पर सचिव, सहकार आयुक्त आदी उपस्थित होते. यावेळी नासाकाने राज्य शिखर बॅँकेकडे चालू गळीत हंगाम सुरू करण्यासाठी १५ कोटींचे कर्ज मागितले असल्याचे नासाकाच्या शिष्टमंडळाने सांगितले. त्यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी नासाका शंभर टक्के एनपीएत असल्याने प्राधिकृत मंडळातील सदस्यांनी वैयक्तिक थकहमी द्यावी, त्यानुसार राज्य शिखर बॅँक टप्प्या टप्प्याने नासाकाला कर्ज उपलब्ध करून देईल, तसेच ज्या कारणांसाठी कर्ज दिले आहे. त्याच कारणांसाठी ते खर्च होत असल्याबाबत राज्य शिखर बॅँकेचे अधिकारी त्यावर नजर ठेवतील, असे स्पष्ट केले.
दुसरीकडे औरंगाबाद येथे झालेल्या साखर आयुक्तांच्या बैठकीत नांदेड, औरंगाबाद, अहमदनगर विभागांमधील साखर कारखान्यांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी नासाकाच्या वतीने कार्यकारी संचालक सुधाकर गोडसे यांनी नासाका क्षेत्रात ३०६८ हेक्टर क्षेत्रावरील उसाची नोंद कारखान्याकडे झाली असून, चालू हंगामात कारखाना सुरू झाल्यास दोन लाख दहा हजार मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे सांगितले. तसेच त्यासाठी महिनानिहाय नियोजन करण्यात आल्याचीही माहिती दिली.