पेठच्या कृषी अधिकाऱ्यांना अटकपूर्व जामीन मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2022 01:16 AM2022-02-17T01:16:43+5:302022-02-17T01:16:58+5:30
पेठ तालुक्यातील कृषी विभागातील सुमारे ५० कोटी रुपयांच्या कथित भ्रष्टाचारप्रकरणी न्यायालयाने बाराही कृषी अधिकाऱ्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. कृषी विभागाच्या विविध योजना कागदोपत्री मंजूर दाखवून, त्यापोटी सुमारे ५० कोटी, ७२ लाख रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आल्याची तक्रार पेठ न्यायालयात करण्यात आल्यानंतर, न्यायालयाच्या आदेशान्वये ५ जानेवारी, २०२२ रोजी पेठ पोलीस ठाण्यात कृषी विभागाच्या बारा अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नाशिक : पेठ तालुक्यातील कृषी विभागातील सुमारे ५० कोटी रुपयांच्या कथित भ्रष्टाचारप्रकरणी न्यायालयाने बाराही कृषी अधिकाऱ्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. कृषी विभागाच्या विविध योजना कागदोपत्री मंजूर दाखवून, त्यापोटी सुमारे ५० कोटी, ७२ लाख रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आल्याची तक्रार पेठ न्यायालयात करण्यात आल्यानंतर, न्यायालयाच्या आदेशान्वये ५ जानेवारी, २०२२ रोजी पेठ पोलीस ठाण्यात कृषी विभागाच्या बारा अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेने कृषी विभाग चर्चेत आला. पोलिसात दाखल झालेल्या गुन्ह्यात किरण सीताराम कडलग, अशोक नारायण घरटे व मुकेश भानुदास महाजन या तिघा कृषी अधिकाऱ्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असता, मुख्य न्यायदंडाधिकारी ए.एस. देशमुख यांनी त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. त्याचाच आधार घेत, अन्य बारा अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.ए. शिंदे यांच्या समोर अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. त्यावर सुनावणी होऊन जे ॲण्ड जे असोसिएट्सचे ॲड.वैभव नामदेव जाधव यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे जाणून घेत, अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर झालेल्यांमध्ये नरेश शांताराम पवार, दगडू धारू पाटील, संजय शामराव पाटील, विठ्ठल उत्तम रंधे, दीपक पिराजी कुसळकर, दिलीप ज्ञानदेव फुलपगार, मुकुंद कारभारी चौधरी, प्रतिभा यादवराव माघाडे, राधा चिंतामण सहारे, विश्वनाथ बाजीराव पाटील, सरदारसिंग उमेदसिंग राजपूत, शीलानाथ जगन्नाथ पवार यांचा समावेश आहे.