पेठ येथे एकच वैद्यकीय अधिकारी
By admin | Published: December 31, 2015 10:31 PM2015-12-31T22:31:16+5:302015-12-31T22:33:52+5:30
ग्रामीण रु ग्णालय : रुग्णसेवेवर परिणाम; आदिवासी रुग्णांची हेळसांड
पेठ : येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्याच्या रिक्त पदांमुळे एकाच अधिकाऱ्याच्या भरवशावर रुग्णांना उपचार सुरू असून, यामुळे आरोग्यसेवा कोलमडली आहे.
पेठ येथे ३० खाटांचे रु ग्णालय असून, दररोज जवळपास ३०० रु ग्ण उपचारासाठी येत असतात. आंतर व बाह्यरु ग्ण विभाग पाहण्यासाठी एकाच वैद्यकीय अधिकाऱ्याला २४ तास ड्यूूटी बजवावी लागत आहे. पेठ ग्रामीण रुग्णालयात एक वैद्यकीय अधीक्षक व दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी दोन पदे रिक्त आहेत. त्यामुळे रात्री-अपरात्री दाखल होणाऱ्या रुग्णांचा एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर भार येत आहे.
पेठ तालुका अतिदुर्गम असल्याने शिवाय नागरिकांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने रु ग्णांना शासकीय दवाखान्याच्या भरवशावर रहावे लागते. ग्रामीण रुग्णालयात अपूर्ण अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे रुग्णांना खासगीत महागडे उपचार करून घ्यावे लागत आहेत. शासनाने भव्य अशी टोलेजंग इमारत बांधली आहे. दाखल होणाऱ्या रु ग्णांची संख्याही मोठी असून, केवळ वैद्यकीय अधिकऱ्यांअभावी रु ग्णसेवा डळमळीत झाली आहे.
पेठ तालुक्यात सात प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. मात्र त्याही ठिकाणी कर्मचाऱ्यांची वानवा असल्याने तालुक्यातील आरोग्यसेवा सलाईनवर असल्याचे दिसून येते. पेठच्या ग्रामीण रु ग्णालयात आठवड्याला दहा ते पंधरा प्रसूतीचे रुग्ण दाखल होत असतात तर रात्री अपरात्री अपघात झाल्यास एका अधिकाऱ्यावर कामाचा भार येत असल्याने ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदे तत्काळ भरावी, अशी मागणी करण्यात येत आहे.(वार्ताहर )