पेठच्या भोपळ्याचा मुंबईच्या बाजारात बोलबाला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 12:49 AM2020-11-26T00:49:04+5:302020-11-26T00:49:31+5:30
भात व नागलीसारख्या पारंपरिक पिकांना फाटा देत पेठ तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी माळरानावर उभ्या केलेल्या भोपळ्याच्या बागा वरदान ठरल्या असून या भोपळ्याला मुंबईच्या बाजारपेठेत चांगलीच मागणी वाढली आहे.
रामदास शिंदे/ पेठ : भात व नागलीसारख्या पारंपरिक पिकांना फाटा देत पेठ तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी माळरानावर उभ्या केलेल्या भोपळ्याच्या बागा वरदान ठरल्या असून या भोपळ्याला मुंबईच्या बाजारपेठेत चांगलीच मागणी वाढली आहे.
कृषी विभागाच्या ‘विकेल ते पिकेल’ या मोहिमेंतर्गत पेठ तालुक्यातील ९० गावांतील ५३७ शेतकऱ्यांनी १४३.७५ हेक्टर क्षेत्रावर तालुका कृषी कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली भोपळ्याची लागवड केली. सध्या शेतकऱ्यांची भोपळा काढणी सुरू झाली असून, नाशिक, बलसाड, नानापोंडा, वापीसह थेट मुंबईला भोपळा पाठवण्यात येत असून, प्रतिक्रेट १२० ते १५० पर्यंत भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांसाठी कमी दिवसात चांगले आर्थिक उत्पन्न देणारे पीक समजले जात आहे. तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे, मंडळ कृषी अधिकारी मुकेश महाजन, विनायक पवार, शरद थेटे, पोलीसपाटील हिरामण जाधव, सरपंच सुरेश जाधव, हेमराज जाधव, काशीनाथ जाधव, रमेश चौधरी, प्रकाश जाधव, विनोद जाधव यांच्यासह शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करून आधुनिक शेतीची कास धरत कृषी उन्नती साधल्याने कोरोनाकाळातही उत्पन्नाचा स्रोत निर्माण केला आहे.