पेठला सागाची तस्करी रोखली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 01:08 AM2020-09-11T01:08:45+5:302020-09-11T01:09:21+5:30
पेठ परिक्षेत्रांतर्गत वनामधून सागाच्या झाडांची कत्तल करत सुमारे २९ सागाचे नग (१.१२९ घनमीटर) अवैधरीत्या तस्करांकडून वाहून नेले जात असताना वनविभागाच्या पथकाने सापळा रचून वाहन ताब्यात घेतले. दरम्यान, अंधाराचा व जंगलाचा फायदा घेत संशयित तस्कर पळून जाण्यास यशस्वी ठरले.
नाशिक : पेठ परिक्षेत्रांतर्गत वनामधून सागाच्या झाडांची कत्तल करत सुमारे २९ सागाचे नग (१.१२९ घनमीटर) अवैधरीत्या तस्करांकडून वाहून नेले जात असताना वनविभागाच्या पथकाने सापळा रचून वाहन ताब्यात घेतले. दरम्यान, अंधाराचा व जंगलाचा फायदा घेत संशयित तस्कर पळून जाण्यास यशस्वी ठरले.
पेठ तालुक्यातील मौजे बारदा गावात वनपरिक्षेत्र अधिकारी सीमा मुसळे यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे प्रादेशिक गस्ती पथकासह पेठ फिरते दक्षता पथकाच्या सहाय्याने दोन सापळे रचले. या गावाच्या शिवारात वनक्षेत्राच्या परिसरात ठिकठिकाणी छापा मारून झाडाझडती घेतली असताना दडवून ठेवलेला सागाचा माल आढळून आला. यामध्ये तासणी वगैरेच्या माध्यमातून घडकाम केलेले सागाचे २९ नग वनविभागाच्या पथकाने जप्त केले. या कारवाईत वनपाल, वनरक्षकांसह वनमजुरांनी सहभाग घेतला. तस्करीच्या उद्देशाने अवैधरीत्या दडविलेला सागाचा हा साठा सुमारे ३८ हजार ९८८ रुपये किमतीचा असल्याचे मुसळे यांनी सांगितले. जप्त केलेल्या सागाच्या नगांपैकी कुठल्याही नगावर स्वामित्व खून नसल्याचे पंचनाम्यात आढळून आले आहे. स्थानिक तस्क रखोरांनी वनक्षेत्रात जाऊन काही दिवसांपूर्वी चोरटी तूट करत सागाच्या लाकडांचे घडकाम केले असल्याचा संशय तपासी पथकाने व्यक्त केला आहे. भारतीय वनअधिनियम १९२७च्या कलम ५२(१)नुसार अज्ञात तस्करखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन पुढील तपास मुसळे करीत आहेत.