पेठ तालुक्यात बळीराजा पेरणीपूर्व मशागतीत मग्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:18 AM2021-06-16T04:18:34+5:302021-06-16T04:18:34+5:30
पेठ : नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेकडील गुजरात सीमारेषेवर वसलेल्या पेठ तालुक्यात मृग नक्षत्राने फारशी दमदार सुरुवात केली नसली तरी वरुणराजाच्या ...
पेठ : नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेकडील गुजरात सीमारेषेवर वसलेल्या पेठ तालुक्यात मृग नक्षत्राने फारशी दमदार सुरुवात केली नसली तरी वरुणराजाच्या प्रतीक्षेसह शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीस प्रारंभ केला आहे.
पेठ तालुक्यात विशेषतः भात, नागली व वरई ही पिके घेतली जात असून, जवळपास २६ हजार हेक्टर शेतीवर खरिपाची लावणी केली जाते. विशेष म्हणजे या तीनही पिकांसाठी पेरणी व लावणी अशा दोन टप्प्यात शेती केली जाते. पहिल्या पावसात शेतातील एका कोपऱ्यात राब भाजलेल्या जागेत बियाणे पेरणी केले जातात, तर दुसरीकडे चांगला पाऊस सुरू झाल्यावर खाचरात पाणी साचल्यावर मशागत करून रोपांची लावणी केली जाते.
या वर्षी मान्सून वेळेवर येईल या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांना पावसाची वाट पाहण्याची वेळ आली असून, बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणीस प्रारंभही केला आहे. तर दुसरीकडे शेतीची मशागत करून डोंगर उतारावर लावणीयोग्य जमीन तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. कोरोनाच्या निर्बंधांत काही प्रमाणात सवलती दिल्याने पेठसह करंजाळी, जोगमोडी येथील बाजारात बियाणे, खते व शेतीची अवजारे खरेदीसाठी शेतकरी दाखल झाले आहेत.
कृषी सेवा केंद्रांना नोटिसा
पेठ तालुक्यात सात शासनमान्य कृषी सेवा केंद्र असून, ग्रामीण भागातील अशिक्षित शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाच्या भरारी पथकाने कृषी सेवा केंद्रांना भेटी देऊन शासकीय नियमांचे पालन करण्याबाबत नोटिसा बजावल्या आहेत. यामध्ये दुकानाच्या दर्शनी भागात भावफलक लावणे, पक्के बिल देणे, इतर खतांच्या खरेदीची सक्ती न करणे आदी बाबींचा समावेश असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे यांनी दिली आहे.
इन्फो...
पीकविम्याची रक्कम मिळावी
मागील वर्षी पेठ तालुक्यातील जवळपास १५ हजार शेतकऱ्यांनी खरीप पिकाच्या विम्याचा हप्ता भरून आपल्या पीक वारीला संरक्षण मिळवून घेतले होते. मध्यंतरी झालेल्या बेमोसमी पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, रीतसर पंचनामे करून प्रस्ताव सादर केला आहे. मात्र अद्याप विम्याची रक्कम मिळाली नसल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करीत विम्याची रक्कम बँक खात्यात जमा करावी, अशी मागणी केली आहे. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांनाही याबाबत निवेदन देण्यात आले आहे.
फोटो
- १४ पेठ १
पेठ तालुक्यात खरीप हंगामासाठी पारंपरिक शेती अवजाराच्या साहाय्याने नांगरणी करताना शेतकरी.
===Photopath===
140621\14nsk_3_14062021_13.jpg
===Caption===
पेठ तालुक्यात खरीप हंगामासाठी पारंपरिक शेती अवजाराच्या साहाय्याने नांगरणी करतांना शेतकरी.