पेठ तालुक्याला पावसाने झोडपले
By admin | Published: July 11, 2016 11:29 PM2016-07-11T23:29:42+5:302016-07-11T23:52:35+5:30
मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत
पेठ : सलग ४८ तासांपासून पेठ तालुक्याला पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे़
पेठ शहर व तालुक्यात शनिवारपासून पावसाची संततधार सुरू होती. मात्र रविवार सकाळपासून पावसाचा जोर अधिक वाढल्याने सर्व तालुका जलमय झाला आहे़ मुसळधार पावसाने सर्व व्यवहार ठप्प घाले असले तरीही दुष्काळाने होरपळून निघालेले्या जनतेला हा पाऊस हवाहवासा वाटत आहे़ रस्ते पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. तालुक्यातील डोंगरदऱ्यातील गावांना जोडणाऱ्या रस्त्यावरील परशीपुलावरून पाणी वाहत असल्याने अनेक गावांचा मोठ्या गावांशी संपर्क तुटला आहे़ तर पेठ-जोगमोडी रस्त्यावर संगमेश्वर व खिरकडे नजीकच्या परशीवरून जोरात पाणी वाहत असल्याने वाहनधारक माघारी फिरल्याचे दिसून आले़ गांडोळे,अ ंबाससह शेपुझरी परिसरात मुसळधार पावसाने नद्यांना मोठा पूर आला आहे़ सतत दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने तालुक्यातील धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून, भाताच्या खाचरात पाणी साचल्याने भातलावणीच्या कामाकडे शेतकरी वळला आहे.़ (वार्ताहर)