पेठ तालुक्यात दोन गट, चार गण शिवसेनेकडे
By admin | Published: February 24, 2017 12:40 AM2017-02-24T00:40:21+5:302017-02-24T00:40:38+5:30
भगवा फडकला : सुरगाणे गणातून सेना उमेदवाराचा निसटता विजय
पेठ : तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गट व चार पंचायत समिती गणातून सर्वच जागा शिवसेनेने जिंकून भगवा फडकवला.
येथील तालुका क्रीडा संकुलात सकाळी १० वाजता निवडणूक निर्णय अधिकारी हेमांगी पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी हरिष भामरे यांच्या उपस्थितीत मतमोजणी सुरू करण्यात आली. सर्वप्रथम धोंडमाळ गणाचा निकाल घोषित करण्यात आला. यामध्ये शिवसेनेचे तुळशिराम भिवा वाघमारे, १२९० मतांनी विजयी झाले. माकपाचे दत्तू पाडवी दुसऱ्या स्थानावर तर राष्ट्रवादीचे गिरीश गावित तिसऱ्या स्थानावर राहिले.
सुरगाणे गणातून शिवसेनेचे विलास अलबाड यांचा ४०२ निसटता विजय झाला. याही गणात माकपाचे नामदेव मोहाडकर दुसऱ्या तर राष्ट्रवादीचे रामभाऊ भोये तिसऱ्या स्थानावर फेकले गेले. करंजाळी गणात शिवसेनेच्या पुष्पा गवळी १५९७ मतांची आघाडी घेत विजय मिळवला. या गणात मनसेच्या ललिता वाघमारे व राष्ट्रवादीच्या अनिता गवळी यांना दुसऱ्या क्रमांकाची सारखेच मते मिळाली.
कोहोर गणात शिवसेनेच्या
पुष्पा पवार ४८४ मतांनी विजयी झाल्या. या गणातून राष्ट्रवादीच्या अनिता गवळी दुसऱ्या स्थानावर तर माकपाच्या हिरा जाधव तिसऱ्या स्थानावर राहिल्या. (वार्ताहर)सासरे-सून दोघेही विजयी ४धोंडमाळ गटातून शिवसेनेचे भास्कर गावित यांनी दुसऱ्यादा विजय मिळवत सत्तेच्या चाव्या आपल्या हाती ठेवल्या. भास्कर गावित २१०९च्या आघाडीने विजयी झाले. आमदार जे.पी. गावित यांचे पुत्र इंद्रजित गावित यांनी कडवी झुंज देत दुसऱ्या क्र मांकाची मते मिळवली. कोहोर गटातून भास्कर गावित यांच्या स्नूषा व श्यामराव गावित यांच्या पत्नी विद्यमान सदस्य हेमलता गावित यांनी १९४४ मतांची आघाडी घेत विजय संपादन केला. मनसेच्या देवता सुधाकर राऊत या दुसऱ्या स्थानावर तर राष्ट्रवादीच्या कविता चौधरी तिसऱ्या स्थानावर राहिल्या.निकालानंतर पेठ शहर भगवेमय
जिल्हा परिषद व पंचायत समिती
निकाल घोषित झाल्यानंतर मतमोजणी कक्षाबाहेर हजारो शिवसैनिकांनी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत परिसर दुमदुमून टाकला. पेठ शहरात सर्वत्र भगवे वातावरण तयार झाले होते. विजयी उमेदवारांसह शिवसैनिक व कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत जल्लोष साजरा केला.