अनैतिक संबंधातून पेठरोडला युवकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 12:43 AM2017-10-28T00:43:50+5:302017-10-28T00:43:57+5:30
पंचवटी : प्रेमसंबंधात अडसर ठरणाºया दिंडोरीरोडवरील दशरथ बाळू ठमके (२७) या युवकाच्या गळ्यावर तसेच पोटावर धारदार शस्त्राने वार करीत चौघा संशयितांनी खून केल्याची घटना शुक्रवारी (दि.२७) उघडकीस आली़ विशेष म्हणजे संशयितांनी ठमकेचा खून केल्यानंतर मृतदेह पेठरोडवरील शरदचंद्र पवार बाजार समितीलगत असलेल्या पाण्याच्या टाकीत फेकून दिला होता़ खुनाची घटना उघडकीस आल्यानंतर पंचवटी पोलिसांनी अवघ्या तीन तासांत चौघा संशयितांना अटक केली आहे़ ठमके हा गत शुक्रवारपासून बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या भावाने पंचवटी पोलीस ठाण्यात दिली होती़ पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिंडोरीरोडवरील मायको परिसरातील अवधूतवाडीत (गजानन चौक) राहणारा मयत दशरथ ठमकेच्या पत्नीचे पंचवटी नागचौकातील जोशी वाड्यात राहणाºया गणेश वसंत गरड याच्यासोबत काही महिन्यांपासून अनैतिक संबंध निर्माण झाले होते. या संबंधांबाबत माहिती मिळाल्याने ठमके याने संशयित गरडला समजावूनही सांगितले होते़ संशयित गणेश गरड याने आपले सहकारी राहुल ऊर्फ भुºया बाबूराव लिलके, उमेश डॅनियल खंदारे, श्याम मधुकर बागुल यांच्या मदतीने ठमके याचा शनिवारी (दि़२१) रात्री काटा काढायचा ठरविले़ शनिवारी रात्री पार्टीच्या नावाखाली संशयितांनी ठमके यास रिक्षात बसवून पेठरोडवरील शरदचंद्र पवार बाजार समितीलगतच्या मोठ्या जलकुंभाजवळ नेल़े़ या ठिकाणी सर्वांनी मद्यपान केल्यानंतर चौघा संशयितांनी मद्याच्या नशेत असलेल्या ठमकेवर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला़ यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याच्या पायाला दोरी बांधून मृतदेह जवळच्या टाकीवर नेऊन पाण्यात फेकून दिला, तर आपला भाऊ दशरथ ठमके हा बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली होती़
बेपत्ता ठमकेचा तपास सुरू असताना पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांना संशयित गरड व मयत ठमकेच्या पत्नीमध्ये अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली़ त्यांनी पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, पोलीस उपनिरीक्षक उबाळे, हवालदार प्रवीण कोकाटे, सुरेश नरवडे, महेश साळुंखे, प्रभाकर पवार, बाळू शेळके, संदीप शेळके यांचे पथक तयार केले़ या पथकाने संशयित गरडसह चौघांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता ठमकेचा खून करून मृतदेह पाण्याच्या टाकीत फेकल्याची कबुली संशयितांनी दिली़ यानंतर पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे, पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर, आनंदा वाघ यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता टाकीत ठमकेचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह पाण्याच्या टाकीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला़
मयत ठमके मोबाइल चोर
अवधुतवाडीतील गजानन चौकात राहणारा मयत दशरथ ठमकेवर पंचवटी पोलीस ठाण्यात मोबाइल चोरीचे गुन्हे दाखल असून, खुनातील प्रमुख संशयित गणेश गरड हा पेट्रोलचोर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे़ काही महिन्यांपूर्वीच हिरावाडीत (भगवतीनगर) पेट्रोलचोरी करताना गरड व त्याच्या साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते़