गेडाम यांच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका

By admin | Published: August 5, 2016 01:41 AM2016-08-05T01:41:11+5:302016-08-05T01:41:22+5:30

टीडीआरविषयक निर्णय : दातीर यांनी घेतली धाव

Petition in the High Court against GEDAM's decision | गेडाम यांच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका

गेडाम यांच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका

Next

 नाशिक : महापालिकेचे माजी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी आपल्या कार्यकाळात घेतलेल्या वादग्रस्त निर्णयांचे पडसाद आता उमटू लागले असून, जनरल मुखत्यारधारकास टीडीआर न देण्याच्या निर्णयाविरुद्ध शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप दातीर यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दातीर यांनी यापूर्वीच गेडाम यांच्याविरुद्ध भंगार बाजारप्रश्नी अवमानना याचिका दाखल केलेली आहे.
दिलीप दातीर यांनी याबाबत पत्रकारांशी बोलताना सांगितले, दि. २७ एप्रिल २०१५ रोजी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी जनरल मुखत्यारधारकास टीडीआर न देण्याचा बेकायदेशीर निर्णय घेतला होता. कोणत्याही जमिनीची
खरेदी करण्याऐवजी मुद्रांक अधिनियमाच्या कायद्यानुसार मुद्रांक शुल्क भरून व जमीन मालकास योग्य तो ठरलेला मोबदला अदा करून तसा तपशील दस्तावेजामध्ये नमूद केला जातो आणि रीतसर जमिनीचे खरेदी-विक्री करण्याचे व त्याबद्दल मोबदला स्वीकारण्याचे अधिकार जनरल मुखत्यार पत्रात घेतले जातात.
सदर प्राप्त अधिकारात जमीन मालक यांचे जनरल मुखत्यार म्हणून सदर व्यक्ती सर्व सरकारी कार्यालयांमध्ये अर्ज, प्रतिज्ञापत्र, विविध नकाशे सादर करून मंजुरी मिळवू शकतात. तसेच इतर लोकांनाही सदर मिळकत विक्री करून मोबदला स्वीकारू शकतात. या अनुषंगाने आजही सर्व कार्यालयांत जनरल मुखत्यार पत्रधारकाचे अधिकार कायम आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही त्याच्या वैधतेवर शिक्कामोर्तब केले आहे.
नोंदणी महानिरीक्षकांनीही अधिकार कायम केले आहेत. असे असताना गेडाम यांनी कुठलेही प्रशासकीय परिपत्रक न काढता तोंडी आदेश देत जनरल मुखत्यार पत्रधारकास महापालिकेतून हद्दपार केले आहे. या निर्णयाविरुद्ध आपण उच्च न्यायालयात धाव घेतली असून, लवकरच याचिका सुनावणीसाठी येणार असल्याचे दिलीप दातीर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Petition in the High Court against GEDAM's decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.