नाशिक येथील वृक्षतोडीबाबत अखेर उच्च न्यायालयात याचिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2022 11:36 AM2022-01-26T11:36:03+5:302022-01-26T11:36:14+5:30
नाशिक मधील वृक्षप्रेमी ऋषिकेश नाझरे आणि मानव उत्थान मंचचे जसबीर सिंग यांच्यासह अन्य वृक्ष प्रेमींनी ही याचिका दाखल केली आहे.
नाशिक- शहरातील दोन उड्डाणपुलांच्या नावाखाली 588 वृक्ष तोडण्याच्या महापालिकेच्या प्रयत्नांना पर्यावरण प्रेमींनी विरोध केला असून आता या प्रस्तावाच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे त्यामुळे महापालिकेत समोरील अडचणी वाढल्या आहेत.
विशेष म्हणजे शुक्रवारी (दि 28) राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे नाशिक मध्ये येऊन अडीचशे वर्षांच्या वट वृक्षाची पाहणी करणार असताना त्याच दिवशी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
नाशिक मधील वृक्षप्रेमी ऋषिकेश नाझरे आणि मानव उत्थान मंचचे जसबीर सिंग यांच्यासह अन्य वृक्ष प्रेमींनी ही याचिका दाखल केली आहे.
या याचिकेत राज्य शासन, वनविभागाचे वनसंरक्षक तसेच नाशिक महापालिका, महापालिका आयुक्त कैलास जाधव, वृक्ष प्राधिकरण समिती आणि या समितीचे सर्व सदस्य शहर अभियंता यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. नाशिक मधील वृक्षतोडी संदर्भात यापूर्वी उच्च न्यायालयात याचिका दाखल असून त्यात कोणते वृक्ष तोडावे आणि कोणते तोडू नये यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत तसेच वृक्षतोडीची कार्यवाही देखील नमूद केले आहे असे असताना महापालिकेच्या वतीने मनमानी पद्धतीने शहरात वृक्षतोड सुरू असून त्यामुळे हा उच्च न्यायालयाचा अवमान असल्याचे मत वृक्ष प्रेमींनी व्यक्त केले आहे.
यासंदर्भात उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर शुक्रवारी (दि 28) दुपारी बारा वाजता ऑनलाईन पद्धतीने सुनावणी होणार असून तशी नोटीस नाशिक महापालिकेला देण्यात आली आहे.