अर्जात ‘मुलीचे नाव’ हा पर्यायच नसल्याची बाब समोर
By Admin | Published: February 6, 2015 02:16 AM2015-02-06T02:16:19+5:302015-02-06T02:19:22+5:30
अर्जात ‘मुलीचे नाव’ हा पर्यायच नसल्याची बाब समोर
नाशिक : महापालिकेच्या वतीने एकीकडे सातत्याने ‘बेटी बचाव’चा उद्घोष सुरू असताना, दुसरीकडे याच धोरणाला हरताळ फासण्याचे काम सुरू आहे. महापालिकेकडून जन्मदाखला मिळावा, यासाठी कराव्या लागणाऱ्या अर्जात ‘मुलीचे नाव’ हा पर्यायच नसल्याची बाब समोर आली आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण घटत असल्याने केंद्र, राज्य शासनाच्या वतीने सर्वदूर ‘बेटी बचाव’चा जागर सुरू आहे. महापालिकेच्या वतीनेही याबाबत जाहिराती, फलकांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. या पार्श्वभूमीवर गर्भलिंगनिदान करणाऱ्या शहरातील सोनाग्राफी लॅबवरही कारवाई करण्यात आली होती. मुले व मुली यांच्या जन्मप्रमाणातील तफावत घटावी आणि भविष्यात मुलांइतकेच मुलींचेही प्रमाण असावे, यासाठी हा सगळा खटाटोप सुरू आहे. दुसरीकडे मात्र महापालिकेच्याच कारभारातून ‘बेटी बचाव’च्या धोरणाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत.
जुन्या पंडित कॉलनीतील नाशिक महापालिकेच्या पश्चिम विभागीय कार्यालयात शहरातील एका ज्येष्ठ व्यक्तीला याचा अनुभव आला. सदर व्यक्ती या कार्यालयात आपल्या नातीच्या जन्माचा दाखला मिळवण्यासाठी गेले. त्यासाठी त्यांच्याकडून संबंधित अर्ज भरून घेण्यात आला; मात्र या अर्जात बालकाचे नाव लिहिण्यासाठी फक्त ‘मुलाचे नाव’ हाच पर्याय उपलब्ध होता. याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, त्यांनी अर्जाचे स्वरूप तसेच असल्याचे सांगितले. मुलगा आणि मुलगी दोन्ही समान मानले जात असताना, महापालिकेच्या जन्मदाखला अर्जात मुलीचे नाव हा पर्याय नाही. यामुळे महापालिकेकडूनच एकप्रकारे मुलींवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)