ब्रह्मगिरीजवळील बांधकामे थांबवण्यासाठी एनजीटीत याचिका
By संजय पाठक | Published: June 24, 2023 03:45 PM2023-06-24T15:45:05+5:302023-06-24T15:46:42+5:30
तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्याची मागणी, पर्यावरण प्रेमी ललीता शिंदे यांची धाव
नाशिक : गोदावरी नदीचे उगमस्थान असलेला ब्रह्मगिरी फोडला जात असून, या परिसरात सुरू असलेली बांधकामे तातडीने थांबवावित तसेच बांधकामांच्या परवानग्या रद्द कराव्यात, यासाठी येथील पर्यावरणप्रेमी ललीता शिंदे यांनी राष्ट्रीय हरित लवादात दाद मागितली आहे.
त्र्यंबकेश्वराजवळील ब्रह्मगिरी हे गोदावरी नदीचे उगमस्थान आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक त्र्यंबेकश्वर ब्रह्मगिरीजवळ आहे. त्यामुळे या स्थानाला महत्त्व आहेच शिवाय हा परिसर इको सेन्सेटिव्ह झोन असून, देखील आता पुन्हा ‘जैसे थे’ स्थिती असल्याने ललीता शिंदे यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल केली आहे.
ब्रह्मगिरी परिसरात सध्या सुरू असलेली सर्व कायदेशीर-बेकायदेशीर बांधकामे त्वरित थांबवावीत, या बांधकामाच्या परवानग्या आणि कमिटमेंट सर्टिफिकेट रद्द करावेत, लवादाने तातडीने एक समिती गठीत करून या परिसराचे सर्वेक्षण करावे आणि कायदेशीर-बेकायदेशीर याची तपासणी करावी, ब्रह्मगिरीच्या सीमांकन करावे, अशा प्रकाराची विनंती ललीता शिंदे यांनी केली आहे. त्यांच्या वतीने ॲड. लक्ष्यवेध ओढेकर यांनी याचिका दाखल केली आहे.