पेट्रोल टाकून विवाहितेला पेटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 01:43 AM2019-04-01T01:43:21+5:302019-04-01T01:43:36+5:30
मित्राच्या पत्नीवर पेट्रोल ओतून तिला जीवंत जाळण्याची धक्कादायक घटना पंचवटीतील कृष्णनगर येथे रविवारी पहाटेच्या सुमारास घडली.
पंचवटी : मित्राच्या पत्नीवर पेट्रोल ओतून तिला जीवंत जाळण्याची धक्कादायक घटना पंचवटीतील कृष्णनगर येथे रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेत ९० टक्के भाजलेल्या रेखा मोरे या विवाहितेचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी संशयित रवींद्र नाना भामरे यास ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कृष्णनगर येथील हरिसिद्धी सोसायटीमध्ये बाळू मोरे हे आपल्या पत्नी रेखा व मुलगी सायली तसेच संशयित रवींद्र भामरेसमवेत राहत होते. शनिवारी रात्री (दि.३०) रेखा व भामरे यांच्यामध्ये घरात राहण्यावरून वाद झाले. त्यानंतर रविवारी सकाळी रेखाचा पती बाळू हा कामासाठी बाहेर गेला असता, रेखा व रवींद्र यांच्यात पुन्हा वादविवाद झाले. यावेळी भामरे याने बेडरूममध्ये प्रवेश करून रेखा हिच्यावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले व तो टेरेसमध्ये येऊन थांबला. काही वेळाने घरातून धूर निघत असल्याने नागरिकांनी अग्निशमन दलाला माहिती कळविली. अग्निशमन दलाच्या जवानांनी व नागरिकांनी घराचा दरवाजा तोडला व घरात लागलेली आग विझविली त्यावेळी रेखा गंभीर भाजलेल्या अवस्थेत आढळली. पंचवटी पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. घटनेनंतर रवींद्रनेही इमारतीच्या टेरेसवर जाऊन विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा बनाव केला.
याप्रकरणी पोलिसांनी भामरेविरुद्ध रात्री उशिरा भामरेविरुद्ध जीवे ठार मारल्याचा गुन्हा नोंदविला. संशयित भामरे याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी
पुढील तपास पंचवटी पोलीस करत आहेत.
सुदैवाने मुलगी बचावली
संशयित भामरे व रेखा यांच्यात सकाळी वादविवाद झाले तेव्हा रेखा यांची सहावर्षीय मुलगी सायली अंघोळीसाठी बाथरूममध्ये होती. भामरे याने पेट्रोल आणून रेखा यांच्या बेडरूममध्ये जाऊन त्यांच्या अंगावर ओतले व पेटवून दिले. आगीच्या ज्वालांनी घरातील कपड्यांसह अन्य वस्तूंनी पेट घेतला. संसारोपयोगी साहित्य जळण्यास सुरुवात झाल्याने काही वस्तू फुटण्याचा आवाज झाल्याने सायली बाथरूमबाहेर येऊन सदनिकेतून बाहेर पळाल्याने ती थोडक्यात बचावली अन्यथा तीलाही आगीने नुकसान पोहचविले असते असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
पोलिसांसह अग्निशमन दलाचे मदतकार्य
४घटनेची माहिती मिळताच पंचवटी अग्निशमन उपकेंद्राचा बंबासह जवान घटनास्थळी पोहचले तसेच पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक कैलास पाटील, उपनिरिक्षक योगेश उबाळे, आश्विनी मोरे, सारिका अहिरराव, रघुनाथ शेगर आदिंनी घटनास्थळी धाव घेत जमलेल्या गर्दीवर नियंत्रण मिळविले. तसेच जवानांनी तत्काळ आग विझवून घराचा दरवाजा तोडून भाजलेल्या अवस्थेत रेखा यांना बाहेर काढले.