महागाई किती रडवणार, चार महिन्यांत पेट्रोल, डिझेल ६ तर सिलिंडर १२५ रुपयांनी महागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:16 AM2021-02-09T04:16:36+5:302021-02-09T04:16:36+5:30

नाशिक : पेट्रोल-डिझेलच्या किमतीत गेल्या चार महिन्यांपासून सातत्याने वाढ होत असून १ नोव्हेंबर २०२०च्या तुलनेत सध्या पेट्रोल ५.६ रुपयांनी, ...

Petrol, diesel prices go up by Rs 6 and cylinders by Rs 125 in four months | महागाई किती रडवणार, चार महिन्यांत पेट्रोल, डिझेल ६ तर सिलिंडर १२५ रुपयांनी महागले

महागाई किती रडवणार, चार महिन्यांत पेट्रोल, डिझेल ६ तर सिलिंडर १२५ रुपयांनी महागले

Next

नाशिक : पेट्रोल-डिझेलच्या किमतीत गेल्या चार महिन्यांपासून सातत्याने वाढ होत असून १ नोव्हेंबर २०२०च्या तुलनेत सध्या पेट्रोल ५.६ रुपयांनी, तर डिझेल ६.२९ पैशांनी वाढले असून स्वयंपाकाच्या गॅसचा सिंलिंडर तब्बल १२५ रुपयांनी महागला आहे. त्यातच केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवर कृषी अधिभार लावल्याने पेट्रोल-डिझेलच्या किमती आणखीनच वाढण्याच्या शक्यता व्यक्त होत असून गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत असलेली महागाई आणखी किती रडवणार, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

एकीकडे पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत असताना दुसरीकडे केंद्र सरकारने लॉकडाऊन सुरू झाल्यापासून म्हणजे एप्रिल २०२० पासून घरगुती गॅस ग्राहकांच्या खात्यात अनुदानाची रक्कमच जमा झाली नसल्याचे अथवा नाममात्र तीन किंवा सार रुपये सबसीडी जमा होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. अशा स्थितीत स्वयंपाकाचा गॅस सिलिंडरही तब्बल १२५ रुपयांनी महागला आहे. विशेष म्हणजे सरकारकडून अनुदानित सिलिंडरच्या किमतीतही जवळपास शंभर रुपये वाढ केली आहे. त्यामुळे ग्राहकांना तीन ते चार रुपये अथवा कोणतेही अनुदान मिळत नसल्याचे प्रकार समोर येत आहेत. नाशिक जिल्ह्यात भारत गॅस, इंडियन ऑइल तसेच हिंदुस्तान पेट्रोलियम या तिन्ही कंपन्यांचे मिळून १३ लाख गॅस ग्राहक आहेत. यातील अनुदानित सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांच्या खात्यात महिन्याला साधारण दहा लाख रुपयांचे अनुदान जमा होते. गॅस सिलिंडरच्या कमी-जास्त होणाऱ्या किमतीनुसार ही रक्कम ठरते. मात्र, एप्रिल २०२०पासून गॅस अनुदानाची रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही.

--

अशी आहे इंधन दरवाढ

महिना - पेट्रोल - डिझेल - गॅस

१ नोव्हेंबर- ८८.२१- ७६.१६ - ५९८

१ डिसेंबर - ८९.४४ - ७८.२० - ६४८

१ जानेवारी - ९०.७६ - ७९.७१ - ६९८

१ फेब्रुवारी - ९३.२८ - ८२.४५ - ७२३

--

केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलचे दर नियंत्रणमुक्त करताना आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीचे फायदे थेट ग्राहकांना मिळतील असे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. उलट सामान्य ग्राहक सतत वाढणाऱ्या महागाईत होरपळून निघतो आहे.

- विशाल कुंदे, पेट्रोल ग्राहक

--

डिझेलच्या दरवाढीचा परिणाम थेट अन्य वस्तूंवरही होत असून त्यामुळे महागाई वाढत आहे. वाहतूक खर्च वाढल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत असून ही महागाई आटोक्यात आणण्यासाठी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कपात आवश्यक आहे.

- राजेंद्र जाधव, मालवाहू वाहनचालक

---

एकीकडे किराणा मालाच्या किमती वाढत असताना दुसरीकडे स्वयंपाकाचा गॅसही महागला आहे. सरकारकडून स्वच्छ इंधनाचा आग्रह धरला जात असताना स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून सबसीडीही मिळणे बंद झाले आहे.

- पूजा कदम, गृहिणी

Web Title: Petrol, diesel prices go up by Rs 6 and cylinders by Rs 125 in four months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.